गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांची धुसफूस रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्यासमोरच तुंबळ हाणामारीत रुपांतरीत झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर त्वेषाने हल्ला चढवला. एकमेकांवर लाथाबुक्क्या, हातातील वस्तूने प्रहार सुरू केला. पोलिसांनाही आवरता नाकीनऊ आले. अखेर राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर लाठीमार करून गर्दी पांगविण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ पोलीस ठाण्याच्या आवारातचे अक्षरशः आखाड्यात रुपांतर झाले होते. राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या जामगाव गटाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार स्वाती दिलीप निरपळ होत्या तर दीपा सचिन मुंदडा अपक्ष उमेदवार होत्‍या. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच लढत रंगली. त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांमध्ये धुसफूसही वारंवार समोर येत होती. यातून अपक्ष उमेदवाराच्या समर्थकाने शिंदे गटाच्या उमेदवाराच्या समर्थकाची कार अडवून मारहाण केली. त्याची तक्रार द्यायला शिंदे गटाच्या उमेदवाराचा समर्थक गंगापूर पोलीस ठाण्यात आला असता, अपक्ष उमेदवाराचेही समर्थकही पोलीस ठाण्यात आले. दोन्हींकडील मोठा जमाव जमला. पोलिसांच्या उपस्थितीतच बाचाबाची होऊन ते आपसात भिडले.

कुणाची काय तक्रार...
गळनिंब (ता. गंगापूर) येथील सरपंच पती तथा पशुवैद्यकीय डॉक्टर भगवान अशोक सटाले (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांची पत्नी अर्चना या गळनिंबच्या तीन वर्षांपासून सरपंच असून गावातीलच मनोज पांडुरंग सटाले याच्याविरुद्ध माझ्या पत्नीने पोलीस ठाण्यात दोन वेळेस तक्रार दिलेली आहे. मनोज सटाले नेहमी काही न काही कारणावरून माझ्यासोबत व माझ्या पत्नीसोबत भांडण करत असतो. शुक्रवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भगवान सटाले व त्यांचे मित्र संदीप जालिंदर मैराळ हे छत्रपती संभाजीनगरकडे कारने जात होते. गळनिंब ते भेंडाळा रस्‍त्‍यावर ठोळे यांच्या शेताजवळ मनोज सटाले याने त्याची कार भगवान सटाले यांच्या कारच्या समोर लावली.

कारच्या दरवाजाजवळ येऊन गाडीच्या खाली उतर, असे म्हणाला. त्याने गाडीचा दरवाजा उघडून गाडीमधून भगवान सटाले यांना कॉलर धरून खाली ओढले व त्यांच्या गळ्यामधील १० ग्रॅमची सोन्याची चैन तोडून घेतली. गाडीच्या गिअर बॉक्सजवळ ठेवलेले ४२ हजार रुपये रोख रक्कम घेत असताना भगवान सटाले यांनी त्याला विरोध केला असता त्याने धक्काबुक्की केली. यात काही रक्कम रोडवर पडली. संदिप मैराळ हे भांडण सोडवत असताना मनोज सटाले याने त्यांनादेखील धक्काबुक्की केली व म्हणाला, की तू जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या विरोधात काम का केले, असे म्हणून त्याने खिशातून चाकू काढून धमकावले, की जर येथून पुढे आमच्या विरोधात काम केले तर तुला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

त्यानंतर भगवान सटाले व संदीप मैराळ हे तक्रार देण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्याकडे येत असताना कऱ्हाळे पेट्रोलपंपापसमोर पुन्हा मनोज सटाले याने अडवून भगवान सटाले व संदीप मैराळ यांना शिविगाळ करून चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर मीसुद्धा तक्रार देतो, असे म्हणाला. भगवान सटाले यांनी त्याला तू माझी सोन्याची चैन व पैसे दे, असे म्हटले. त्यावर तो मला म्हणाला की, तुझ्यामुळे आमचे खूप नुकसान झाले. मी देत नाही तुला काय करायचे ते कर, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर भगवान सटाले हे  पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या गटाची तक्रार
दुसऱ्या गटातील विशाल अशोक निरपळ (वय २५, रा. गणेशवाडी ता. गंगापूर) यांनीही याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ८ फेब्रुवारीला ते व त्यांचा मित्र गणेश लक्ष्मण निरपळ गंगापूर शहरात कामानिमित्ताने आले होतो. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्यासमोरून मोटारसायकलीने जात असताना त्याला त्याचे काका दिलीप निरपळ दिसले. त्यामुळे ते पोलीस ठाण्याच्या आवारात आले. तिथे त्याचे काका दिलीप निरपळ, बाळू शिंदे, भगवान अशोक सटाले यांना रामेश्वर मुंदडा, सुमित मुंदडा, सचिन मुंदडा, अमित मुंदडा, महेश मुंदडा, प्रशांत सुंब, राहुल सटाले, बिरजू भरपुरे, किरण साळवे व अन्य १० ते १५ जण शिवीगाळ करून तुम्ही निवडणुकीच्या कारणावरून मनोज सटालेसोबत का भांडण केले, असे म्हणून अंगावर धावून जात धक्काबुक्की करत होते.

त्यामुळे विशाल व त्याचा मित्र गणेश भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असताना रामेश्वर मुंदडा, सुमित मुंदडा, सचिन मुंदडा, बिरजू भरपुरे, प्रशांत सुंब, राहुल सटाले, किरण साळवे यांनी विशाल व गणेशला लाथाबुक्क्यांनी तोंडावर, डोक्यावर, पाठीवर मारहाण करून मला मुक्का मार दिला. सुमित मुंदडा याने विशालच्या डोक्यात कोणत्यातरी वस्तूने मारून जखमी केले. सुमित मुंदडा याने तुम्हाला जास्त माज आला आहे, तुला व तुझा काका दिलीप निरपळ याला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दाखवतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी आमचे भांडण मिटविले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. रामेश्वर मुंदडा, सुमित मुंदडा, सचिन मुंदडा, अमित मुंदडा, महेश मुंदडा, प्रशांत सुंब, राहुल सटाले, बिरजू भरपुरे, किरण साळवे व १० ते १५ जणांविरुद्ध कारवाईची मागणी विशालने केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त

Latest News

बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाच गायींना अत्यंत क्रूरपणे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून टेम्पोतून नेणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी शुक्रवारी...
हॉस्पिटल टाकण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये आणण्याची मागणी, विवाहितेला घराबाहेर काढले, हर्सूल पोलिसांनी डॉक्टर पतीविरुद्ध गुन्हा दाखल
चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software