कॉलेज विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, सातारा परिसरातील घटना, आत्‍महत्‍येपूर्वी आत्‍येभावाला केला मेसेज...

-मुकुंदवाडीतील तरुणाची फुलंब्रीच्या किनगावमध्ये आत्‍महत्‍या -सिल्लोड शहरातही युवकाने उचलले टोकाचे पाऊल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आत्‍येभावाला अर्जंट ये, असा मेसेज करत कॉलेज विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना सातारा परिसरातील आमदार कॉलनीत शुक्रवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास समोर आली. आदित्य माधव राठोड (वय २१, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे या तरुणाचे नाव आहे.

आदित्यचे वडील शिक्षक असून, त्याला लहान भाऊ आहे. आदित्यला १२ वीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते. तो देवगिरी महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तणावात होता. त्याच्या आत्याचा मुलगाही याच भागात राहतो. सायंकाळी त्याने जेवणासाठी दोन वेळा आदित्यला कॉल केला. मात्र आदित्यने कॉल उचलला नाही. त्यानंतर आदित्यचाच भाऊ अर्जंट ये असा मेसेज त्याला आला. त्यामुळे तो लगेचच आदित्यच्या रूमवर गेला असता आदित्यने गळफास घेतल्याचे दिसले. तत्काळ आदित्यला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास केला जात आहे. त्याच्या आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मुकुंदवाडीच्या तरुणाची फुलंब्रीतील किनगावमध्ये आत्‍महत्‍या
फुलंब्री तालुक्यातील किनगावजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेऊन दीपक एकनाथ रूम (वय २४, रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी घडली. दीपक शुक्रवारी दुपारी ३ वाजता किनगाव येथे छत्रपती संभाजीनगरहून बहिणीला भेटण्यासाठी आला होता. सायंकाळी साडेसातला त्याने गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात उडी घेतली. बंधाऱ्याजवळ त्याची चप्पल आढळली. फुलंब्री पोलिसांनी शुक्रवारी रात्री घटनास्थळी येऊन शोध घेतला. मात्र उपयोग झाला नाही. शनिवारी सकाळी अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. सकाळी १० ला दीपकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. दीपकने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आलेले नाही.

सिल्लोडमध्ये युवकाची आत्‍महत्‍या
सिल्लोड शहरातील शिवाजीनगरात राहत्या घरी गणेश रघुनाथ मिरगे (वय ३६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी ३.३० च्या सुमारास समोर आली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश मिरगे यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हेमराज मिरी करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software