- Marathi News
- सिटी डायरी
- दहावी, बारावी परीक्षेसाठी शिक्षण विभागासोबतच प्रशासनही सज्ज, कठोर उपायोजना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह...
दहावी, बारावी परीक्षेसाठी शिक्षण विभागासोबतच प्रशासनही सज्ज, कठोर उपायोजना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये १० वी आणि १२ वी च्या परीक्षा होणार आहेत. जिल्ह्यात १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी, तर १० वीची परीक्षा ६८ हजार २२३ विद्यार्थी देणार आहेत. त्यासाठी एकूण ३९९ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. १० वी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये १० वी आणि १२ वी च्या परीक्षा होणार आहेत. जिल्ह्यात १२ वी ची परीक्षा ६३ हजार ९७८ विद्यार्थी, तर १० वीची परीक्षा ६८ हजार २२३ विद्यार्थी देणार आहेत. त्यासाठी एकूण ३९९ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. १० वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त व्हाव्यात. त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २७ जानेवारीला केले.
१० वी : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- १७ केंद्र ५९२२ विद्यार्थी, छत्रपतीसंभाजीनगर शहर-७५ केंद्र २१ हजार ७५८ विद्यार्थी, गंगापूर ३१ केंद्र, ९८२० विद्यार्थी, कन्नड २२ केंद्र ५७१३ विद्यार्थी, खुलताबाद ११ केंद्र, २६३४ विद्यार्थी, पैठण-२१ केंद्र, ५९६० विद्यार्थी, सिल्लोड-२५ केंद्र ६६०७ विद्यार्थी, सोयगाव-६ केंद्र, १५०१ विद्यार्थी, वैजापूर १७ केंद्र, ४८१९ विद्यार्थी फुलंब्री १३ केंद्र ३४८९ विद्यार्थी.
१२ वी : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण- २० केंद्र ८०८६ विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर शहर-३३ केंद्र १४ हजार २५५ विद्यार्थी, गंगापूर १४ केंद्र, ६४०० विद्यार्थी, कन्नड १९ केंद्र ६०१२ विद्यार्थी, खुलताबाद १२ केंद्र, ४६२५ विद्यार्थी, पैठण-१६ केंद्र, ५८०२ विद्यार्थी, सिल्लोड-१७ केंद्र ६०५३ विद्यार्थी, सोयगाव-८ केंद्र, ३११४ विद्यार्थी, वैजापूर ११ केंद्र, ५३०१ विद्यार्थी फुलंब्री ११ केंद्र ४३३० विद्यार्थी.
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, शिक्षण विभागासह सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षण संस्था व केंद्र यांचा सन्मान केला जाणार असून कॉपी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) अश्विनी लाटकर, शिक्षण मंडळ सहसचिव सचिव प्रियाराणी पाटील, शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी(योजना) अरुणा भुमकर यांच्यासह सर्व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
परीक्षा केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार
जिल्ह्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमती लाटकर यांनी दिली. शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही याची खबरदारी परीक्षा केंद्र, संस्था चालक, नियुक्त कर्मचारी,अधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी घ्यावी, असे लेखी आदेश देण्यात येतील. कॉपी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून केंद्राच्या जवळ असणाऱ्या झेरॉक्स मशीन बंद करण्यात येतील. परीक्षाकेंद्राबाहेर पालकांची होणारी विनाकारण गर्दी, विविध पुस्तकांची विक्री थांबवण्यात यावी, याबाबतचे सर्वेक्षण संबंधित तालुकास्तरावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी करावे. परीक्षा केंद्रावर भरारी पथक, बैठे पथक, केंद्रामधील बदल व स्थानिक वातावरण यानुसार नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण विभागांना दिल्या.