गारखेड्यातील थरार : जमीन व्यावसायिकाच्या ११ वर्षीय नातीच्या अपहरणाचा प्रयत्‍न; नागरिकांच्या पाठलागामुळे कार सोडून पळाले ५ अपहरणकर्ते!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गारखेड्यातील थराराने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. बुधवारी (१६ जुलै) सायंकाळी साडेसातला कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळीने जमीन व्यावसायिकाच्या ११ वर्षीय नातीचा अपहरणाचा प्रयत्‍न केला. मुलीची रोज ने-आण करणारे चालक नवनाथ छेडे यांच्यासह स्थानिक तरुणांनी जिवाची पर्वा न करता अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. वाहतुकीच्या अडथळ्यामुळे आपण पकडले जाऊ, या भीतीने मुलीला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गारखेड्यातील थराराने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. बुधवारी (१६ जुलै) सायंकाळी साडेसातला कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळीने जमीन व्यावसायिकाच्या ११ वर्षीय नातीचा अपहरणाचा प्रयत्‍न केला. मुलीची रोज ने-आण करणारे चालक नवनाथ छेडे यांच्यासह स्थानिक तरुणांनी जिवाची पर्वा न करता अपहरणकर्त्यांचा पाठलाग सुरू केला. वाहतुकीच्या अडथळ्यामुळे आपण पकडले जाऊ, या भीतीने मुलीला अर्ध्या रस्त्यात सोडून अपहरणकर्ते पसार झाले. गारखेड्यातील नाथ प्रांगण ते शिवाजीनगरदरम्यान हा थरार घडला. पुढे रस्ता न दिसल्याने साराराजनगरमध्येच कार सोडून अपहरणकर्ते कार सोडून पळून गेले.

११ वर्षीय रिया (नाव बदलले आहे) ही आईच्या आई-वडिलांसोबत खोकडपुऱ्यात राहते. तिला आई नसून, वडील हैदराबादला असतात. तिचे आजोबा प्लॉटिंगचा व्यवसाय करतात. रिया सहावीत शिकते. गारखेडा भागातील नाथ प्रांगणात ट्युशनसाठी येते. रिया कारने चालकासोबत सायंकाळी ५ ला ट्यूशन आली. सायंकाळी सव्वा सातला ट्युशन संपल्यानंतर इमारतीच्या खाली आली. चालक नवनाथ छेडे तिच्या प्रतीक्षेत उभे होते. एकाने छेडे यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांचे लक्ष विचलित करत गुंतवून ठेवले. त्याचवेळेत संधी साधून सुसाट कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी रियाला उचलून कारमध्ये टाकले. ही बाब लक्षात येताच छेडे यांनी तत्काळ धाव घेत कारमध्ये घुसून रियाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.

मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. नंतर छेडे यांना ढकलून देत अपहरणकर्त्यांची कार सुसाट शिवाजीनगरकडे निघाली. रिया आणि छेडे यांची आरडाओरड ऐकून तेथे राहणारे नागरिक धावून आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यासह तरुणांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. काहींनी कारवर दगडही फेकले. छेडे वेगाने कारमागे पळत होते. त्यामुळे समोर असणाऱ्या लोकांनीही कारला अडविण्याचा आटोकाट प्रयत्‍न चालवला होता. शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दिशेने अपहरणकर्त्यांची वळताच क्रिस्टल वाइन शॉपसमोर वाहनांच्या गर्दीमुळे अपहरणकर्त्यांच्या कारचा वेग कमी झाला. आता आपण पकडले जाऊ या भीतीने त्‍यांनी रियाला तिथेच उतरवून देत पुढे पलायन केले. कारचा पाठलाग करणाऱ्यांनी रियाला रस्त्याच्या बाजूला आणले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. मोठी गर्दी जमली. नागरिकांनी रियाला धीर देत खाऊ, पाणी दिले.

साराराजनगरमध्ये कार मिळाली…
रियाला उतरवून दिल्यानंतर पाठलाग होणार नाही, असे वाटून त्‍यांनी क्रिस्टल वाइन शॉपसमोर रियाला सोडले. त्यानंतर त्यांची कार महावितरणच्या कार्यालयाकडून तुळजाभवानी चौकातून भारतनगरच्या दिशेने सुसाट निघाली. साराराजनगरमध्ये अरूंद गल्लीबोळांत रस्ताच संपल्याने कार पुढे नेण्यास अडचण झाली. त्यामुळे त्यांनी कार तिथेच सोडून पळ काढला. नाथ प्रांगणापासून ५०० मीटर अंतरावर अपहरणकर्त्यांनी रियालसा सोडले आणि पुढे ३०० मीटर अंतरावर साराराजनगरमध्ये त्यांची कार मिळून आली. कारमध्ये बनावट नंबर प्लेटचा साठा मिळून आला.

बीअरच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, काळे मास्क व मोठ्या आकाराचा स्कार्फही मिळाला. छेडे यांना झटापटीत चाकू लागल्याने कारमधील सीट रक्ताने माखले होते. कारच्या क्रमांकाचे शेवटचे दोन क्रमांक खोडले होते. सीएससीएनने माहिती घेतली असता, ही कार यापूर्वी तीन वेळा विकल्याचे समोर आले आहे. मूळ मालकाचा पत्ता पुण्याचा असून, तिसरा खरेदीदार शहरातील निघाला. त्याने दीड महिन्यापूर्वीच कार खरेदी केली होती. स्थानिक नागरिक, तरुण आणि चालकांच्या सतर्कतेमुळे रियाची सुटका झाली. जिवाची पर्वा न करता अपहरणकर्त्यांशी भिडलेले छेडे १० वर्षांपासून रियाच्या आजोबाकडे नोकरी करतात. त्यांच्या घराखालीच ते कुटुंबासह राहतात.

रिया निघाली धाडसी…
अपहरणकर्त्यांनी रियाचे अपहरण केल्यानंतर कारमध्ये आजोबाचा मोबाइल नंबर विचारला. तिने पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक सांगितला. वडिलांबद्दल विचारल्यावर वडील पोलीस असल्याचे सांगितले. यामुळे अपहरणकर्ते गोंधळून गेले होते. किसको उठा लाये बें… असे वारंवार सोशल मीडियावर रीलमध्ये वाक्य व्हायरल होत असते, अगदी तशीच प्रचिती काही काळ अपहरणकर्त्यांना झाली असावी. धाडसी रियाने एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावाही घेतला. या घटनेनंतर पोलीस अलर्ट मोडवर आले असून, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्‍त डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, शहर गुन्हे शाखेचे संभाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे शिवप्रसाद पांढरे यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती घेतली.

अपहरणकर्त्यांच्या शोधात ६ पथके लावली आहेत. सर्व दिशांनी पोलीस तपास करत आहेत. रियाची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजोबांचा व्यवसाय यादृष्टीनेही अपहरणर्त्यांच्या उद्देशाचा माग काढला जात आहे. रिया कधी ट्युशनला येते, जाते हे अपहरणकर्त्यांना माहीत होते. त्‍यामुळे ते तिची माहिती बाळगून मागावर असावेत, असा अंदाज आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा ट्यूशन सुटूनही अपहरणकर्ते तेथे आल्याने संशय वाढला आहे. त्यांना रस्त्याची नीटशी माहिती नसल्याचेही घटनेतून दिसून आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी

Latest News

दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी दुचाकी चोरून वर्ष उलटले, त्‍याला वाटलं पोलीस विसरले, पण त्‍याचवेळी पोलिसांचे हात त्‍याच्यापर्यंत पोहोचले!, मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कामगिरी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : न्‍यू एसटी कॉलनीतून दुचाकी चोरली आणि वर्ष उलटले, चोराला वाटले पोलीस विसरूनही गेले असतील, पण...
पत्‍नीला लोखंडी रॉडने मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल, सिडको एमआयडीसीतील घटना
छ. संभाजीनगरमध्ये घरपोच सेवा देणार ‘सेवादूत’; ॲप जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले लोकार्पण
त्रिकूट चोरांना पोलीस कोठडीची ‘लिफ्ट’; गादिया विहारच्या त्रिलोक हाईट्‌समधील साडेतीन लाखांचे लिफ्ट पार्ट्‌स केले होते गायब, जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी म्‍होरक्याला पुण्याहून आणले पकडून
Health News : हाडांच्या कर्करोगाची लक्षणे : थकवा-कमकुवतपणा... कर्करोग हाडांना वाळवीसारखे खाईल, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software