- News
- सिटी क्राईम
- लातूर-छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज पुरवठ्यातील मुख्य दुवा शाहीद अलीला अटक, चंपा चौकात चारही तस्करांची पो...
लातूर-छत्रपती संभाजीनगर ड्रग्ज पुरवठ्यातील मुख्य दुवा शाहीद अलीला अटक, चंपा चौकात चारही तस्करांची पोलिसांनी धिंड!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नशेच्या औषधीचा मोठा साठा घेऊन लातूरहून छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेली तवेरा कार पकडून पोलिसांनी १८ लाख ७८ हजार ८०० रुपयांची नशेची औषधी जप्त केली होती. तिघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या तस्करांना नशेच्या औषधीचा साठा पुरवणारा मुख्य संशयित सय्यद शाहीद अली सय्यद इब्राहीम अली (वय ३०, रा. एस. टी. कॉलनी, उदगीर, जि. लातूर) याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शाहीदचे उदगीरमध्ये मेडिकल होते. ते बंद करून तो नशेखोरांच्या रॅकेटमध्ये उतरला आहे. त्याने डी. फार्मसीची पदवी घेतली आहे. नशेखोरांना औषध विक्री करून दहापट पैसे मिळवत होता.
शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांचे पथक केंब्रीज चौकात वाहने तपासत असताना शनिवारी (२४ जानेवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास पांढऱ्या तवेरा कारला थांबण्याचा इशारा केला. त्याने वाहन न थांबवता सावंगी रोडने नारेगावच्या दिशेने सुसाट निघाला. संशयित सुसाट कार आय. पी. मेस सावरकर चौकात येत असल्याचे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, चालक पोलीस अंमलदार दादाराव झारगड, पोलीस अंमलदार प्रमोद सुरसे यांनी त्यांचे शासकीय वाहन चौकात आडवे लावले आणि तवेराला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तवेरा चालकाने वाहन न थांबवता थेट पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातले. सुदैवाने वेळीच पोलीस अधिकारी, कर्मचारी बाजूला झाले. हुल देऊन कार टीव्ही सेंटरकडे निघून गेला. पंचायत समिती कार्यालयाजवळ सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्या पथकाने रस्त्यावर अडथळा निर्माण करून तवेरा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही तवेरा चालकाने थेट पोलीस अधिकारी व अंमलदारांना चिरडण्याचा प्रयत्न केला होता. यात पोलीस अंमलदार गणेश सागरे जखमी झालेले आहेत.
तस्करांची चंपा चौकातून धिंड...
शाहीद हा केवळ सप्लायर नसून गुजरातच्या कंपन्या आणि छत्रपती संभाजीनगरचे तस्कर यांच्यातील मुख्य दुवा होता. मेडिकल बंद केल्यावरही तो कागदोपत्री मेडिकल सुरू असल्याचे दाखवून गुजरातच्या कंपन्यांतून कोडीन सिरपचा साठा मागवत होता. पकडलेल्या चारही तस्करांची पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी चंपा चौकात पायी धिंड काढली. लाऊड स्पिकरद्वारे अशपाक पटेलची माहिती देण्याचे आवाहनही केले. शेख समीर, उमर अब्दुल, सय्यद आणि शाहीद हे मान खाली घालून चालत असताना नागरिकांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या धिंड पॅटर्नचे स्वागत केले. पोलिसांनी अशपाकच्या घराची झाडाझडती घेतली.

