- News
- एक्सक्लुझिव्ह
- ३०० हून अधिक पुरस्कार, २६ वर्षांची प्रामाणिक सेवा, चातुर्य-धाडसी गुण... शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब
३०० हून अधिक पुरस्कार, २६ वर्षांची प्रामाणिक सेवा, चातुर्य-धाडसी गुण... शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब आंधळे ठरले पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे हकदार!
छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार बाळासाहेब आंधळे यांना यंदाच्या मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेले, कर्तव्याशी निष्ठा राखणारे बाळासाहेब आंधळे हे तब्बल २६ वर्षांपासून पोलीस दलात सेवा बजावत आहेत. अनेक थरार प्रसंग, त्यातूनही समयसूचकता राखत घेतलेल्या निर्णयांमुळे ते आजवर वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. त्यांचा जीवनप्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे गावात एका साध्या शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब आंधळे यांच्यावर कष्ट, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे संस्कार झाले. आजही ते सुटीच्या काळात गावी गेल्यावर स्वतः शेतात काम करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. १ ऑक्टोबर २००० रोजी बाळासाहेब आंधळे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत आले. सुरुवातीपासूनच त्यांनी जबाबदारी गांभीर्याने घेतली. २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी पोलीस दलातील विविध महत्त्वाच्या शाखांमध्ये काम केले. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त कार्यालय, बेगमपुरा, वाहतूक शाखा, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच आर्थिक गुन्हे शाखा व पुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सध्या कार्यरत आहेत.
वाहतूक शाखेत कार्यरत असताना शिस्तबद्ध कारवाई, जनजागृती आणि अपघात नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले. वाळूज एमआयडीसीसारख्या संवेदनशील औद्योगिक परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नरत राहिले. आर्थिक गुन्हे शाखेत असताना तपासातील बारकावे, पुराव्यांची अचूक मांडणी आणि प्रकरणांचा सखोल अभ्यास यामुळे त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आजवर त्यांना ३०० पेक्षा अधिक बक्षिसे व अनेक वेळा प्रशस्तीपत्रे, सन्मानपत्रे आणि वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळाली आहेत.
पोलीस सेवेत असताना अनेक वेळा जीवावर बेतणाऱ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. बाळासाहेब आंधळे यांच्या आयुष्यातही असे काही क्षण आले. २०१७ साली भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत वाळूज एमआयडीसी हद्दीत आंदोलनादरम्यान पोलीस जीप फोडण्यात आली होती. त्या गोंधळात प्रसंगावधान राखत स्वतःला आणि सहकाऱ्यांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले. २०१८ मधील मराठा आंदोलनादरम्यान बजाजनगर परिसरात कर्तव्य बजावत असताना त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. त्यावेळीही कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाला श्रेय
यशामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे श्री. आंधळे सांगतात. वेळोवेळी मिळालेले चांगले मार्गदर्शन, शिस्त आणि अनुभवातूनच आपण घडलो, असे त्यांचे मत आहे. आज स्वतः अनुभवी अंमलदार म्हणून ते अनेक तरुण पोलिसांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. काम करताना संयम कसा ठेवावा, नागरिकांशी कसे वागावे आणि कठीण प्रसंगी निर्णय कसे घ्यावेत, याचे ते जिवंत उदाहरण ठरले आहेत.
आव्हानांबद्दल म्हणाले...
सध्याच्या काळात पोलिस अंमलदारांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. याबाबत बोलताना बाळासाहेब आंधळे सांगतात, की आज पोलिसांना केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे या दुहेरी भूमिका निभवावी लागते. एवढ्यावरच न थांबता तपास, तांत्रिक बाबी, सामाजिक तणाव आणि वाढत्या अपेक्षा या सगळ्यांचा सामना एकाच वेळी करावा लागतो. वेळेच्या मर्यादेत, नियमांच्या चौकटीत राहून काम करणे हे मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा पोलीस दल समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत आहे, याची जाणीव नागरिकांनी ठेवावी, असे ते आवर्जून सांगतात. नागरिकांना ते नेहमीच आवाहन करतात की पोलिसांना सहकार्य करा, चुकीची कामे दिसल्यास निर्भयपणे कळवा, कारण पोलिस हे समाजाचे शत्रू नसून रक्षक आहेत, असे ते म्हणाले. बाळासाहेब आंधळे यांच्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेची दखल घेत शासनाने २६ जानेवारी रोजी त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान केले. हा सोहळा मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात मैदानावर झाला. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद क्षण ठरला.

