- News
- सिटी क्राईम
- निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे खून प्रकरण : क्रांती चौकात बिर्याणी खाणाऱ्या अक्षयवर पोलिसांनी घातल...
निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे खून प्रकरण : क्रांती चौकात बिर्याणी खाणाऱ्या अक्षयवर पोलिसांनी घातली झडप!; हत्येनंतर मोबाइल नष्ट करण्याची बजावली होती कामगिरी, पत्नीला भेटायला आला अन् अडकला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या मोबाइलची विल्हेवाट लावण्याची कामगिरी विशाल विकास राठोड (वय २४, रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) याने त्याचा जिवलग मित्र अक्षय बाळकृष्ण शेटे (वय २४, रा. गिधानी गल्ली, चितेगाव, ता. पैठण) याच्यावर सोपवली होती. अक्षय मोबाइल घेऊन पुण्याला गेला आणि शनिवारवाडा परिसरात मोबाइल नष्ट करून नालीत फेकला. विशालच्या चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अक्षयच्या शोधात होते. शुक्रवारी (२० मार्च) शहरात परत येऊन क्रांतीचौकात मित्रासोबत बिर्याणी खात असताना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर झडप घालत अटक केली.
१४ मार्चला वृत्तपत्रात लोंढेंच्या हत्येची बातमी वाचल्यानंतर मात्र अक्षयला घाम फुटला. तो १४ मार्चपासून जालन्यातील एका मित्राकडे लपला होता. २० मार्चला रमानगरात पत्नीला भेटायला आला. मित्रासोबत रात्री ११ वाजता क्रांतीचौकात हातगाडीवर बिर्याणी खाण्यासाठी येताच शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. आता त्याने विल्हेवाट लावलेल्या मोबाइलच्या तपासासाठी सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांचे पथक पुण्याला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अक्षय आणि विशाल कॉलेजपासूनचे मित्र अक्षयची कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण आहे. काही वर्षांपूर्वी आपल्या हॉटेलमध्ये विशालने अक्षयला नोकरीही दिली होती. सध्या अक्षय शहरातील एका भांड्याच्या दुकानात कामाला होता. अक्षयच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले तेव्हा विशालने त्याला आर्थिक मदत केली होती. त्यामुळे अक्षय हा विशालच्या उपकारांखाली दबलेला होता.
अशी केली होती हत्या
राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या हत्या प्रकरणात रीलस्टार विशाल विकास राठोड (वय २४), त्याचा मेव्हणा आकाश विनोद पवार (वय ३२, दोघे रा. रा. गेवराई तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि नातेवाइक करण विलास आडे (वय २२, रा. गिरनेर तांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आलेली आहे. लोंढे ज्योतीनगरात राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले पुण्याला राहतात. ते मूळचे सौंदरे (ता. बार्शी) येथील होते. ५ फेब्रुवारीला रात्री लोंढे, विशाल आणि आकाशने दोन महिलांसोबत दौलताबादच्या एका फार्महाऊसवर पार्टी केली. पार्टीनंतर दोन्ही महिला गेल्यावर तिघे फार्महाऊसबाहेर पडले. नगरनाक्यावरून छावणी लोखंडी पूल ओलांडल्यानंतर विशालने बंदूक लोंढेंच्या कानाला लावत गोळी झाडली. ही बंदूक लोंढेंचीच होती, जी पार्टीदरम्यान विशालने काढून घेतली होती. हत्येनंतर करणला बोलावून घेत ६ फेब्रुवारीला सकाळी ६ ते ७ दरम्यान गेवराई तांडा येथे आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला होता.

