- News
- सिटी क्राईम
- पैठण गेट थरार : इमरानच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, दिवसभर तणाव, दोनदा पोलिसांचा मार्च, अतिक्रमित दु...
पैठण गेट थरार : इमरानच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, दिवसभर तणाव, दोनदा पोलिसांचा मार्च, अतिक्रमित दुकानांवर चालणार बुलडोझर
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठणगेट येथील एस. एस. मोबाईल शॉपीसमोरील अंडा भुर्जी गाडीसमोर सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास शेख परवेज शेख मेहमूद (वय ३६, सब्जीमंडी) याने इमरान अकबर कुरेशी (वय ३३, रा. सिल्लेखाना) याची चाकूने गळा चिरून हत्या केली. त्याचा चुलत भाऊ चुलत भाऊ इब्राहिम नसीर कुरेशी (वय ३५, रा. सिल्लेखाना) आणि जिजा हारुण उस्मान कुरेशी (रा. मुंबई) यांच्यावरही चाकूचे वार करत गंभीर जखमी केले. शहराच्या वाढत्या खुनाच्या घटना, लूटमार, चोऱ्या, हाणामाऱ्या आणि त्यामुळे भयग्रस्त झालेले नागरिक... पोलिसांचा गुन्हेगारांवर न राहिलेला वचक यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. पोलिसांनी हत्या करणाऱ्या परवेजसह त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या तिघांना अटक केली असून, चौघांनाही न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुकुंदवाडीत खून झाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेने एकत्र येत तिथल्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला होता. या खुनामुळेही अतिक्रमित दुकानांचा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यामुळे महापालिकेने पैठण गेटवरील अतिक्रमणांवर बुलडोझर चालविण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, तशी नोटीसही दुकानदारांना दिली. अतिक्रमणे काढून न घेतल्यास पोलीस बंदोबस्तात या दुकानांवर बुलडोझर चालवला जाईल. दरम्यान, या घटनेमुळे पैठण गेट भागात तणाव कायम आहे. मंगळवारी (११ नोव्हेंबर) दोनदा पोलिसांनी सहायक पोलीस आयुक्त पंकज अतुलकर यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढून लोकांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. दिवसभर सर्व दुकाने बंद होती. कडेकोट बंदोबस्त होता. दंगा काबू पथकही तैनात होते.
कुरेशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी सिल्लेखाना महापालिकेच्या झोन कार्यालयात ठिय्या दिला. पैठण गेट येथील अनधिकृत दुकानांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे सायंकाळी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने दोन दुकानांवर नोटीस चिकटवली. अनधिकृत बांधकामांसदर्भातील ही नोटीस असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले. बांधकाम परवानगी, मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याचे नोटिसीत सूचित करण्यात आले आहे. या दुकानांसोबतच पैठण गेटवरील अन्य अतिक्रमित दुकानांवर लवकरच पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालविला जाणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
अशी घडली हत्या...
मृतक इमरानचे चुलत भाऊ इब्राहिम नसीर कुरेशी (वय ३५, रा. सिल्लेखाना) यांनी क्रांती चौक पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, इब्राहिम हे वडील नसीर, आई आरसिया, पत्नी सना आणि चार मुलांसोबत राहतात. त्यांचा चुलत भाऊ इमरान हा त्यांच्या शेजारीच त्याची आई शहेनाज, भाऊ आवेज, पत्नी नाहेदा आणि चार मुलांसोबत राहत होता. तीन दिवसांपूर्वी इमरानचा पैठणगेट येथील मोबाईल शॉपी मालक सलीम शरीफ शेख याच्यासोबत वाद झाला होता. एस. एस. मोबाईल शॉपीसमोरील भुर्जीच्या गाडीवर भुर्जी खाण्यासाठी इमरान वरचेवर उभा राहत असल्याच्या कारणावरून हा वाद सुरू होता. त्याबाबत शनिवारी (८ नोव्हेंबर) रात्री १० ला कलीम कुरेशी यांच्यासमक्ष त्यांच्यात समझोताही झाला होता. कलीम कुरेशी यांनी इमरान कुरेशी आणि सलीम शेख यांना यापुढे मनात कोणाताही राग न ठेवता झालेला किरकोळ वाद विसरून जाण्यास सांगितले होते. सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास पैठणगेट येथील एस. एस. मोबाईल शॉपीसमोरील अंडा भुर्जी गाडीसमोर इब्राहिम, इमरान आणि त्यांचे मुंबईचे जिजा हारुण उस्मान कुरेशी असे तिघेजण अंडा भुर्जी खात बसले होते. त्यावेळी परवेज शेख याने त्याच्या एम. आर. मोबाईल शॉपीमधून इमरानला आई, बहिणीवरून शिवीगाळ करत इधर क्या देख रहा है, असे विचारले. त्यानंतर तो त्याच्या दुकानामधून अचानक हातात चाकू घेऊन आला. त्याने आल्या आल्या इमरानच्या गळ्यावर वार केला. इमरानच्या गळ्यावर डाव्या बाजूस चाकूचा वार बसल्यामुळे तो गंभीर जखम होऊन कोसळला. त्यावेळी परवेज शेख म्हणाला की, अभी इसका काम हो गया, तू बाकी है, असे म्हणताच इब्राहिम आणि हारुण कुरेशी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परवेजने त्याच्या हातातील चाकूने हारुण कुरेशी यांच्या छातीवर चाकूचा वार केला. मात्र ते उजव्या बाजूला चपळाईने वळले. त्यामुळे वार उजव्या हाताच्या दंडावर लागला. ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर परवेजने इब्राहिम यांना मारण्यासाठी चाकू उगारला असता त्यांनी त्याचा हात पकडून ठेवला. त्यावेळी परवेजने त्यांच्या हाताला झटका देऊन हातातील चाकूसह तो एअरटच मोबाईल शॉपी आणि डी. एच. मोबाईल शॉपी या दुकानांमधून खय्युम शरीफ शेख यांच्या मदतीने त्याच्यासोबत बाहेर पळून गेला. इमरान कुरेशी गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळला होता. त्याच्या गळ्यातील जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागल्याने इब्राहिम आणि जिजा हारुण कुरेशी यांनी इमरानला रिक्षातून घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक पवन चौधरी करत आहेत.

