- News
- सिटी क्राईम
- MIM च्या आंदोलनात छत्रपती संभाजीनगरात हुल्लडबाजी!; आक्षेपार्ह घोषणा, चांदणे चौकात आक्षेपार्ह झेंडा र...
MIM च्या आंदोलनात छत्रपती संभाजीनगरात हुल्लडबाजी!; आक्षेपार्ह घोषणा, चांदणे चौकात आक्षेपार्ह झेंडा रोवण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमधील आंदोलनाच्या निषेधार्थ एमआयएमने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी (२० जुलै) धरणे आंदोलन केले. या वेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे भाषण सुरू असताना जमावाने आक्षेपार्ह घोषणाबाजी सुरू केली. आंदोलन संपल्यानंतर परतताना जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चांदणे चौकात एकत्र येत आक्षेपार्ह झेंडा रोवण्याचा प्रयत्न करून पुन्हा घोषणाबाजी आणि […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमधील आंदोलनाच्या निषेधार्थ एमआयएमने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी (२० जुलै) धरणे आंदोलन केले. या वेळी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे भाषण सुरू असताना जमावाने आक्षेपार्ह घोषणाबाजी सुरू केली. आंदोलन संपल्यानंतर परतताना जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चांदणे चौकात एकत्र येत आक्षेपार्ह झेंडा रोवण्याचा प्रयत्न करून पुन्हा घोषणाबाजी आणि वाहने अडवायला सुरुवात केली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेऊन या टवाळखोरांना पिटाळले. काहींना लाठ्यांचा प्रसाद दिला. त्यानंतर हा जमाव पसार झाला. यावेळी गल्लीबोळात पळालेल्या टवाळखोरांच्या मागे धावून पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या शोधासाठी दोन घरांत कोम्बिंग ऑपरेशनही राबविले. मात्र टवाळखोर मिळून आले नाहीत. पोलिसांनी वेळीच घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली.

मुस्लिम वसाहतींवरील हल्ला हा सरकार पुरस्कृत होता, असा गंभीर आरोप यावेळी इम्तियाज जलील यांनी केला. जातीयवादी शक्तींनी मुस्लिमांची धार्मिक स्थळे असलेल्या दर्गाह, मशिदींवर आणि निष्पाप मुस्लिम समाजावर भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात घरांचे व दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ते काढण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशालगडावरील दर्गाहवर दगडफेक केली. घरांचे आणि दुकानांचे नुकसान करून मुस्लिम समाजातील लोकांना मारहाण केली, असा आरोप जलील यांनी केला. धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या तोडफोड केलेल्या घरांची शासनाने नुकसान भरर्पाइ द्यावी. हल्ल्यातील जखमींना पाच लाखांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांना करण्यात आली आहे.
यावेळी जलील म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी संभाजीराजे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक ऐक्यावर असलेले पुस्तक मला भेट दिले होते. ते पुस्तक आगामी काळात कोल्हापूरला जाऊन मी त्यांना भेटून परत करणार आहे. सामाजिक ऐक्याची व्याख्या पुन्हा नव्याने विचारणार आहे, असेही जलील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. तरीदेखील त्याच समाजाला लक्ष्य करणे आम्ही सहन करणार नाही. शासनाचा गुप्तचर विभाग अपयशी ठरला, असा आरोप जलील यांनी केला.
किराडपुऱ्यात बंदोबस्त तैनात
चांदणे चौकात आक्षेपार्ह घोषणा देऊन पसार झालेल्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, विशेष शाखेसह सिटी चौक पोलिसांच्या पथकाने किराडपुरा, शहागंज भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. मात्र ते मिळून आले नाहीत. या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले. दरम्यान, किराडपुरा येथील श्रीराम मंदिरासमोर दंगा काबू पथक आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

