- News
- सिटी क्राईम
- सिडको कॅनॉट प्लेसमध्ये कॉलेज तरुणांमध्ये चालला चाकू, दोन गटांत तुंबळ हाणामारी, १७ जण जखमी, दोघांची प...
सिडको कॅनॉट प्लेसमध्ये कॉलेज तरुणांमध्ये चालला चाकू, दोन गटांत तुंबळ हाणामारी, १७ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको कॅनॉट प्लेसमध्ये रविवारी (वय २५) रात्री ९ च्या सुमारास कॉलेज तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूचे वार केले. लाठाकाठ्यांनी एकमेकांवर तुटून पडले. यात दोन्ही गटांतील १७ जण जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिडको पोलिसांनी सोमवारी (२६ जानेवारी) दोन्ही गटांतील १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या पवन दिगंबर गिते (वय २०, रा. जयभवानीनगर लोकशाही कॉलनी एन ४ मुकुंदवाडी) याचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. त्याच्यावरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने जबाबात सांगितले, की तो सध्या शिक्षण घेत असून, त्याचा भाऊ जेसीबी ऑपरेटर आहे. तो गवारे चहा, कॅनॉट प्लेस या ठिकाणी चहा पिण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याचा दूरचा नातेवाइक शैलेश घुगे व त्याचे मित्र आणि विशाल खेत्रे, त्याचा मित्र उत्कर्ष सोपारकर आणि इतर आठ ते दहा जण अनोळखी मुले यांचा आपसात वाद चालू होता. त्यावेळी विशाल खेत्रे हा त्याच्याकडील चाकू घेऊन शैलेशला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मित्र उत्कर्षच्या हातात लाकडी दांडा होता व तोदेखील शैलेश व त्याच्या मित्रांना मारहाण करत होता. त्यांच्या भांडण सोडविण्यासाठी पवन गेला. त्यावेळी विशाल खेत्रे व त्याचा मित्र उत्कर्ष तसेच त्यांच्यासोबतचे इतर सहा, सात मुले हे पवन, शैलेश यांना मारण्यासाठी मागे धावू लागले.
विशाल खेत्रे त्याच्या सोबतच्या मुलांना बोलू लागला, की यांना पकडा, यांचा गेमच करून टाकू. मी आताच बाहेर आलो असून परत काही दिवस आत जाऊन येतो. पण याचा गेम करू... उत्कर्षने पवनच्या डाव्या डोळ्याजवळ लाकडी दांड्याने मारले. शैलेश घुगे व त्याच्या मित्रांवरही विशाल खेत्रे, उत्कर्ष व त्यांच्या मित्रांनी चाकू व लाकडी दांड्याने हल्ला चढवला. त्यामुळे पवन, शैलेश पळत पळत रोडने मराठा हॉटेलपासून पुढे जात असताना विशालने चाकूने पवनच्या पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत असणाऱ्या गौरव वानखेडे नावाच्या मुलाने देखील तो मोठा गुन्हेगार असल्याचे सांगून पवनच्या कपाळावर, उजव्या बाजूस खांद्यावर मारून जखमी केले. लोक जमा झाल्याने ते सर्व जण निघून गेले, असे पवनने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.

