‘नॉर्मल’ म्हणून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णाचा दोन तासांत मृत्यू!; घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. छातीत दुखत असल्याने शनिवारी (१३ डिसेंबर) पहाटे ४ च्या सुमारास प्रकाश तुळशीराम गायकवाड (वय ४२, रा. हर्सूल) यांना कुटुंबीयांनी घाटीत आणले होते. ऑन ड्युटी डॉक्टरने तपासणी करून ईसीजी काढला, रक्तदाब तपासला. नॉर्मल असल्याचे सांगत गोळ्या लिहून देत ॲडमिट करून घेण्याऐवजी रुग्णाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र रुग्णाच्या छातीत दुखणे, अस्वस्थता होती. घरी गेल्यानंतर पुन्हा छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे सकाळी ७ ला पुन्हा घाटी रुग्णालयात आणले असता रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइक संतप्त झाले. त्यांनी उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात घाटी प्रशासनाने ५ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली असून, ८ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे घाटी रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला. चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी नातेवाइकांनी पार्थिव ताब्यात घेतले. चौकशी समितीत अध्यक्ष म्हणून बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर, सदस्य सचिव औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिराझ बेग, सदस्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचिता जोशी, ओएसडी डॉ. सुरेश हरबडे, प्रशासकीय अधिकारी महेश गावडे यांचा समावेश आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले, की मी स्वतः रुग्णाच्या नातेवाइकांशी बोललो आहे. सखोल चौकशी करून समिती ८ दिवसांत अहवाल देईल.

मृतक प्रकाश यांचे भाऊ दीपक गायकवाड यांनी पत्रकारांना सांगितले, की भाऊ प्रकाश यांना पहाटे चारला अपघात विभागात दाखल केले. तपासणी करून ईसीजी काढून तो नॉर्मल असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे ईसीजीवरील तारीखही चुकीची होती. छातीत दुखत असतानाही डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतले नाही. आम्ही घरी गेल्यानंतर २ तासांनी पुन्हा त्रास सुरू झाला. त्यानंतर घाटीत आणले तेव्हा तपासून मृत घोषित केले. दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. भविष्यात अशा प्रकारे रुग्णाचा जीव जाणार नाही, यासाठी रुग्णालय प्रशासनाने पावले उचलावीत, असे ते म्हणाले. प्रकाश गायकवाड यांना दोन मुले आहेत.

डॉ. भट्टाचार्य यांचा दावा
मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दावा केला, की रुग्णाचा बीपी नॉर्मल होता. ईसीजीदेखील नॉर्मल होता. त्यानंतर छातीतीत दुखणे कमी करण्याचे इंजेक्शन दिले. ॲसिडिटी कमी करण्याची गोळी दिली. रुग्ण नॉर्मल वाटल्यामुळे डिस्चार्ज दिला. मात्र त्यांना पुन्हा आणल्यानंतर त्यांचा अगोदरच मृत्यू झालेला होता. नवीन ईसीजी मशीन १५ दिवसांपूर्वीच आणलेली असल्यामुळे सेटिंग करताना चूक झालेली आहे. मात्र, रुग्णासमोरच तो ईसीजी काढलेला असून त्यांना लगेच दिला, असा दावा त्यांनी केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software