सिडको एमआयडीसी ठाण्यात सराईत गुन्हेगाराशी पोलिसांची जोरदार झटापट; गुन्हेगाराने तोडफोड करत पोलिसांना केली बेदम मारहाण!, दोन पोलीस जखमी, गुन्हेगारही रक्‍तबंबाळ!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारेगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या जनाजा मोर्चात गोंधळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी पकडून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले असता त्‍याने पोलीस ठाणे अक्षरशः डोक्‍यावर घेतले. पोलिसांना अश्लील शिवीगाळ करताना झटापट सुरू केली. अर्धा डझनवर पोलिसांना तो ऐकत नव्हता, पोलिसांना बेदम मारहाण करू लागला. खुर्च्या, वस्‍तूंची फेकझोक करून तोडफोड केली. हा राडा शुक्रवारी (१ ऑगस्ट) दुपारी तीनच्या सुमारास झाला.

जमीर सलीम शेख ऊर्फ कैची (वय २६, रा. गल्ली नं. २, माणिकनगर, नारेगाव छत्रपती संभाजीनगर) असे या राडा करणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्‍याच्याविरुद्ध पोलीस अंमलदार संतोष गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ११ ला जनाजा मोर्चा बंदोबस्त कामी नारेगाव येथे गायकवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मेनकुदळे, पोलीस अंमलदार ढवळे, कोतवाल, सोनवणे, सिरामवाड, पुरी, सोनवणे, तेलुरे, पोळ, गवळी, महिला पोलीस अंमलदार तायडे, जाधव असे तैनात होते. दुपारी अडीचच्या सुमारास  जनाजा मोर्चामध्ये नारेगाव येथे जमीर कैची हा रस्त्यात त्याची मोटरसायकल आडवी लावून रस्ता अडवून जोरजोरात आरडाओरडा करून गोंधळ घालत पोलिसांना शिवीगाळ करून नारे देत होता. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अंमलदार गायकवाड व सोनुने यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्‍याला पकडून पोलीस वाहनात बसवले. 

वाहनाची खिडकी फोडून अंमदाराला बाहेर फेकण्याचा प्रयत्‍न...
नारेगाव येथून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्‍याला आणत असताना अचानक त्‍याने टू मोबाइलच्या खिडकीला डोके मारून काच फोडून मुझे जबरदस्ती पोलीस स्टेशन क्यों ले जा रहे हो, आज मै मरता नही, तुझेही खतम कर देता, असे बोलून गायकवाड यांच्या कॉलरला गच्च पकडून चालत्या गाडीत फुटलेल्या खिडकीच्या बाहेर गायकवाड यांना ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ते पाहून पोलीस अंमलदार सोनुने, वाव्हळ हे मदतीला धावले. पोलीस ठाण्यात आणल्यावरही तो जोरजोरात आरडाओरड करून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करू लागला. 

झटापट, खुर्च्या-साहित्‍यांची फेकझोक, पोलिसांना मारहाण...
महिला पोलीस उपनिरीक्षक लाटे, पोलीस उपनिरीक्षक पचलोरे, सहायक पोलीस निरीक्षक लहाने, पोलीस अंमलदार पांढरे व अन्य पोलिसांनी त्‍याला रोखण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍याने ठाण्यातील खुर्च्या व इतर साहित्य पोलिसांना फेकून मारू लागला. त्याच्या हातातील खुर्चीच्या टोकाने गायकवाड यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. सोनुने यांना हाताचापटाने मारहाण केली. पोलिसांशी झटापटीमध्ये तो खाली पडत होता, त्यावेळी त्याला ठिकठिकाणी मार लागत असूनही तो काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. ठाणे अंमलदारांच्या रूमचा उजव्या बाजूच्या काचेच्या दरवाजावर स्वतःचे डोके जोरात आपटून त्‍याने दरवाजाचे नुकसान करून स्वतः च्या डोक्याला मारून जखमी करून घेतले, असे तक्रारीत गायकवाड यांनी म्‍हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत. (या बातमीसोबतचे छायाचित्र एआयद्वारे प्रतिकात्‍मक बनवले गेले आहे.)

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला!

Latest News

रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला! रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबच्या मालकावर जीवघेणा हल्ला!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशनजवळील हॉटेल न्यू पंजाबचे मालक रोहित सुनिल राठोड (वय ३५, रा. जालाननगर रेल्वेस्टेशन परिसर) यांच्यावर...
चिकलठाण्यातील वीर गुर्जर फुड्स कंपनीत चोर शिरतात तेव्हा...
औरंगपुऱ्यातील डॉ. नितीन बापट यांच्या क्लिनिकचा प्रताप; वैद्यकीय कचरा थेट रस्‍त्‍यावर!
मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्‍त अध्यात्मातच : महंत रामगिरी महाराज; वैजापूरमध्ये १४ गावे मिळून घेताहेत अखंड हरिनाम सप्ताह
‘डेडलाइन’ हुकण्याचा विक्रम नावे असलेला शिवाजीनगर भुयारी मार्ग रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत राहणार बंद!‌
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software