- Marathi News
- सिटी क्राईम
- बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, छ. संभाजीनगर शहरातील भोईवाड्यातील दु...
बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, छ. संभाजीनगर शहरातील भोईवाड्यातील दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील भोईवाड्यात शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी बांधकामासाठी खोदलेल्या १० फूट खोल खड्ड्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. शेख आहाद शेख शरीफ (वय ७) व शिफान शाकेर खान (वय ५, रा. मध्यवर्ती बसस्थानकासमोर, भोईवाडा) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. खड्ड्यात एकाचा उतारावरून पाय घसरत असल्याचे पाहून दुसरा मदतीसाठी धावला अन् दोघेही बुडाल्याचे समोर आले आहे.
आहादचे वडील फळविक्रेते आहे. आई घरीच असते. एक मोठी, तर एक लहान बहीण असून, तो दुसरीत शिकत होता. शिफानचे वडील ट्रॅव्हल एजन्सीत मॅनेजर असून, एक मोठा भाऊ व एक लहान बहीण असून, तो केजीच्या पहिल्या वर्गात शिकत होता. पोलीस सूत्रांनी सांगितले, की मेफकुज उर रहमान यांचा हा प्लॉट असून, आठ महिन्यांपूर्वी त्यांनी बांधकाम सुरू केले. झाकीर कुरेशी नावाच्या ठेकेदाराला त्यांनी बांधकामाचे कंत्राट दिले आहे. ठेकेदाराने भोईवाड्यातील मैदानाकडून भिंत पाडून मुरूम काढण्यासाठी उतार तयार केला आहे. एका बाजूने उतरता रस्ता, तर दुसऱ्या बाजूने जवळपास ८ ते १० फूट खोल खड्डे खोदले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचले आहे.
क्रांती चौक पोलीस ठाण्यात नागरिकांचा जमाव
बांधकाम सुरू असताना दोन्ही बाजूंनी पत्रे लावून बंद करणे बंधनकारक असते. नागरिकांनी ठेकेदाराला वारंवार प्लॉट बंद करून खोदकाम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याने दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला. दोन्ही चिमुकल्यांचे नातेवाइक आणि नागरिका क्रांती चौक पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. त्यावर पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.