महापालिका निवडणुकीसाठी पोलीस अलर्ट मोडवर!; रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करणार, ११०० जणांना त्यांचे शस्‍त्रे जमा करण्याचे आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. तशीच महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. कायदा सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांना हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात परवाना घेऊन शस्‍त्रे बाळगणाऱ्या ११०० जणांना त्यांची शस्‍त्रे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मतमोजणी होईपर्यंत ही शस्‍त्रे पोलिसांकडे जमा असतील.

शहर पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी मंगळवारी (१६ डिसेंबर) सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने सूचना केल्या. बैठकीला विशेष शाखा, शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जुन्या व नव्या मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथे सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. सर्व मुद्द्यांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी  अधिकाऱ्यांना केली. तडीपारीचे अधिकाधिक प्रस्ताव पाठवा, गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर एमपीडीएसारख्या कारवाया वेगाने करा, अशा सूचनाही पोलीस आयुक्‍तांनी दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शहरात सध्या ३८०० पोलीस अधिकारी, अंमलदार आहे.

महापालिका निवडणूक असल्याने अतिरिक्‍त बंदोबस्तही लागू शकतो. वाढीव बंदोबस्त मागवला असल्याचे पोलीस आयुक्त पवार यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर सामाजिक, धार्मिक पोस्ट करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे सायबर पोलिसांची स्वतंत्र टीम २४ तास ऑनलाइन गस्त घालत आहे. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात असल्याचे शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गुन्हेगार, समाजकंटकांवर आमची करडी नजर आहे. नागरिकांना कुठेही संशय वाटल्यास त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांनी केले आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software