मंगळवार ठरला अपघातवार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ अपघातांत ५ जणांचा मृत्‍यू

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन टीम) : फुलंब्री, वैजापूर आणि कन्‍नड तालुक्‍यात झालेल्या चार भीषण अपघातांत ५ जणांचा मृत्‍यू झाला आहे. कन्‍नडच्या बनशेंद्र्याजवळ आयशर ट्रकने दुचाकीला उडवल्याने दोघांचा, वैजापूरच्या झोलेगाव पाटीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा, फुलंब्रीच्या पीरबावडाजवळ कारच्या धडकेने एकाचा आणि फुलंब्रीच्याच आडगाव बुद्रूक येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्‍यू झाला. या सर्व घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन टीम) : फुलंब्री, वैजापूर आणि कन्‍नड तालुक्‍यात झालेल्या चार भीषण अपघातांत ५ जणांचा मृत्‍यू झाला आहे. कन्‍नडच्या बनशेंद्र्याजवळ आयशर ट्रकने दुचाकीला उडवल्याने दोघांचा, वैजापूरच्या झोलेगाव पाटीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा, फुलंब्रीच्या पीरबावडाजवळ कारच्या धडकेने एकाचा आणि फुलंब्रीच्याच आडगाव बुद्रूक येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्‍यू झाला. या सर्व घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) घडल्या.

कन्‍नड : आयशर ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्‍यू
भरधाव आयशर ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघा दुचाकीस्वारांचा मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) सायंकाळी कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा गावाजवळ घडली. संतोष महादू मोरे (वय २६) आणि कैलास उर्फ बाळू दगडू वानखेडे (वय ३०, दोघेही रा. भोईवाडा नरसिंहपूर, ता. कन्नड) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. ते कन्‍नड- वैजापूर रोडने चापानेरहून कन्‍नडला जात होते. बनशेंद्रा (ता. कन्‍नड) गावाजवळ कन्‍नडकडून वैजापूरकडे येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (क्र. एमएच ४१ एयू ५८७७) त्‍यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २० जीएस ०२०४) धडक दिली. दुचाकी चक्‍काचूर होऊन ट्रकही उलटला. संतोष आणि कैलास वानखेडे गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी त्‍यांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. सोहेल शेख यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. संतोष यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे, तर कैलास यांच्या पश्चात पत्‍नी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

वैजापूर : दोन दुचाकींची धडक, शेतकऱ्याचा मृत्‍यू, दोन बांधकाम मजूर गंभीर
छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील झोलेगाव पाटीजवळ (ता. वैजापूर) दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्‍यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. गणपत म्हसू पिंगळे (वय ५१, रा. मनेगाव ता. वैजापूर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. गणपत पिंगळे मंगळवारी दुपारी तुरी विकण्यासाठी लासूर स्टेशनला गेले होते. तुरी विकून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मनेगावकडे येत असताना झोलेगाव पाटीजवळ गारजकडून देवगाव रंगारीकडे जाणाऱ्या दुचाकीशी त्‍यांच्या दुचाकीची धडक झाली. यात गणपत पिंगळे यांचा जागीच मृत्‍यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील राजस्थान येथील दोन बांधकाम मजूर गंभीर जखमी झाले. शिऊर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पिंगळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्‍नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

फुलंब्री : कारची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्‍यू, एक जखमी
फुलंब्री- राजूर महामार्गावर पीरबावडाजवळ भरधाव स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री नऊला घडली. अशोक गुलाबराव सोळुंके (वय ४५, रा. कोलते पिंपळगाव, ता. भोकरदन) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. अशोक सोळुंके दुचाकीने (क्र. एमएच २०, जीव्ही ०४०७) गावी जात होते. राजूरकडून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच ०२, सीव्ही ८७३१) त्यांच्या दुचाकीसह आणखी एका दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कारमधील चालकासह इतरांनी कार तेथेच सोडून पोबारा केला. वडोद बाजार पोलिसांनी मयतासह जखमीला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीला (नाव कळू शकले नाही.) छत्रपती संभाजीनगरला हलविले.

फुलंब्री : पादचाऱ्याला उडवून वाहन पसार, जागीच मृत्‍यू
फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रूक येथील बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी भागीनाथ यमाजी मगरे (वय ५०, रा. आडगाव बुद्रूक, ता. फुलंब्री) यांचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. मगरे हे शेताकडून गावाकडे पायी येत होते. याचवेळी फुलंब्रीकडून निधोनाकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. मगरे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. शेतकऱ्यांनी मगरे यांना फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस ठाण्यात घेतली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू

Latest News

वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू वाळूज MIDC त हिट ॲन्‍ड रन : कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला आयशर वाहनाने उडवले, जागीच मृत्‍यू
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये जे. के. कंपनीजवळ आयशर वाहनाने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू...
छत्रपती संभाजीनगरहून पती दोंडाईचाला येऊन मला छळतो, जगणे असह्य केलेय, विवाहितेची सिडको MIDC पोलिसांत तक्रार
विजेच्या धक्क्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू, गंगापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना
पंक्‍चर झालेल्या कारला मागून सुसाट पिकअपने उडवले, १ गंभीर, मुकुंदवाडीतील पीव्हीआरसमोरील घटना
Tech News : उद्या, १ सप्टेंबरपासून पेटीएम बंद होणार आहे का? फोनवर नोटिफिकेशन, सोशल मीडियावर प्रश्नांचा वर्षाव...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software