- Marathi News
- सिटी क्राईम
- सारंच भयंकर होतं, पोलिसांना आई-बहिणीवरून शिव्या, तिथेच मारण्याची धमकी… कर्तव्यदक्ष CP प्रवीण पवार य...
सारंच भयंकर होतं, पोलिसांना आई-बहिणीवरून शिव्या, तिथेच मारण्याची धमकी… कर्तव्यदक्ष CP प्रवीण पवार यांनी पोलिसांना बळ दिले, अन्यथा अशा मस्तवालांसमोर पोलिसांचे झाले असते खच्चीकरण!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मील कॉर्नर चौकात वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दैनसिंग जोनवाल कर्तव्यावर असताना व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीतून आलेल्या मस्तवाल कुणाल दिलीप बाकलीवाल (वय ३२, रा. शांतारमण विहार, बीड बायपास) या बिल्डरने पोलिसांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करत दोन तासांत सस्पेंड करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मील कॉर्नर चौकात वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार दैनसिंग जोनवाल कर्तव्यावर असताना व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीतून आलेल्या मस्तवाल कुणाल दिलीप बाकलीवाल (वय ३२, रा. शांतारमण विहार, बीड बायपास) या बिल्डरने पोलिसांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करत दोन तासांत सस्पेंड करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली. याबाबतचे वृत्त छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी रविवारी (२६ जानेवारी) दिले. एनसी दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यानंतर बाकलीवालविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्याची गाडीही जप्त केली आणि त्यालाही अटक करण्यात आली. २४ तास त्याला पोलीस कोठडीची हवा खाऊ घालण्यात आली.
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक गणपत जाधव (वय ३९) यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नक्की काय घडलं ते नमूद केलं आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की २४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार ते रात्री आठपर्यंत ते आणि त्यांचे सहकारी सहायक फौजदार बागुल, सहायक फौजदार कदम, पोलीस हवालदार जाधव, पोलीस अंमलदार जोनवाल मिल कॉर्नर चौकात कर्तव्य बजावत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास खडकेश्वरकडून मिल कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर अचानक सायरन वाजवत काळ्या रंगाची डिफेंडर कार आली. त्यामुळे सहकारी पोलीस अंमलदार जोनवाल हे कोणीतरी VIP येत आहेत असे समजून त्यांना रस्ता देण्यासाठी चौकातील वाहने बाजूला करत असताना डिफेंडर कार ही जोनवाल यांच्याजवळ आली. त्या कारमधील कुणाल बाकलीवाल याने त्याच्या बाजूकडील काच खाली करून जोनवाल यांना “अबे XX, तेरे को ट्राफिक हॅन्डल करणे आती नही क्या, पब्लिक के टॅक्स से तुम पगार लेते हो ’, असे म्हणाला. त्यावर जोनवाल यांनी त्याला “माझी चुकी काय, मी काय केले’ असे म्हटले.
त्याने पुन्हा कोणाला तरी फोन लावला आणि बोलू लागला की, “मैं हॉर्न और हुटर बजा रहा था. तभी ट्राफिक निकालना छोडके २००-५०० के चक्कर में ट्राफिक जाम कर रखा है, पोलीस वाले है, तो मेरे बाप है क्या, पब्लिक के टॅक्स से पगार मिलती और हमको टाईटा मारेंगे क्या, मैं मीडिया बुलाके पंचनामा कर देता, मेरे पास ये आठ दिन के फूटेज है, मेरा नाम कुणाल बाकलीवाल है क्या आपको करना है कर लो… असे म्हणून त्याने अचानक त्याच्या कारचा दरवाजा उघडून एपीआय जाधव यांच्या हाताला धक्का दिला. त्यानंतर त्याने डिफेंडर गाडीतून उतरून पो. अं. जोनवाल व सहाय्यक फौजदार बागूल या दोघांच्या गणवेशावरील नेमप्लेटचे फोटो काढले आणि तो म्हणाला की, ये फोटो भेजे है, तुम दोनो को सस्पेंड कर दो केह के. त्यानंतर तो आमच्याकडे रागाने पाहत त्याची काळ्या रंगाच्या कारच्या काचांना गडद काळ्या फिल्म लावलेली, तसेच त्याच्या कारवरती टॉप लाईट लावून बदल केलेल्या डिफेंडर कारमध्ये (MH 20 GK1819) बसून निघून गेला. त्यावरून क्रांती पोलिसांनी बाकलीवालविरुद्ध बीएनएस कलम १३२,३५२,३५१(२) सह मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम १००(२)/१७७, ११९(२)/१७६१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत.

२४ तास पोलीस कोठडीत डांबला…
या प्रकरणात सुरुवातीला क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बोटचेपी भूमिका घेत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलीस वर्तुळात या घटनेची चर्चा झाली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे यांनी रविवारी क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत सक्त कारवाईचे आदेश दिले. त्याच्याविरुद्ध बीएनएस कलम १३२,३५२,३५१(२) सह मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम १००(२)/१७७, ११९(२)/१७६१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील माने, सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी बाकलीवालच्या घरातून मुसक्या आवळल्या. व्हीआयपी सायरन असलेली महागडी डिफेंडर गाडीही जप्त करण्यात आली. त्याची रात्री वैद्यकीय चाचणी करण्यात आली. २४ तास त्याला पोलीस कोठडीत ठेवले होते.