- Marathi News
- पॉलिटिक्स
- मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंचा सरकारला इशारा, क्रांती चौकात चक्का जा...
मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंचा सरकारला इशारा, क्रांती चौकात चक्का जाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उपोषण करून पदयात्रा काढूनही सरकारला जाग येत नसेल तर आता शेतकरी कर्जमाफीसाठी पुढचे आंदोलन भगतसिंगगिरीने करू, मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, असा इशारा प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारला दिला आहे.
आंदोलनासाठी अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरात येण्यास कडू यांना दुपारचे ४ वाजले. त्यामुळे सकाळी ११ वाजता सुरू होणारे आंदोलन प्रत्यक्षात दुपारी ४ वाजून ११ मिनिटांनी सुरू झाले. कडू यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. नंतर मार्गदर्शन केले. कडू येण्यापूर्वीच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल, मनसेचे नेते प्रकाश महाजन, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ, किरण पाटील-डोणगावकर, भाऊसाहेब जगताप यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शवला.
वाहतुकीचा खोळंबा...
दुपारी चारला बच्चू कडू क्रांती चौकात आले. त्यामुळे पोलिसांनी क्रांती चौकातील खालील वाहतूक थांबवून उड्डाणपुलावरून सुरू केली. नंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी गेले. मग, पोलिसांनी तातडीने क्रांती चौक ते आकाशवाणीपर्यंत वाहतूक बंद केली. परिणामी ४५ मिनिटे जालना रोड, उस्मानपुरा, उत्सव चौक, सिल्लेखाना ते मोंढादरम्यान वाहतूक खोळंबली.
ठळक मुद्दे...
-दिव्यांग व मूकबधिर आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
-राज दाभाडे हा कार्यकर्ता आंदोलनात चक्क आ. संजय गायकवाड बनून आला. लुंगी-बनियान घालून अधूनमधून गायकवाडांसारखी बॉक्सिंगची ॲक्शन करत होता.
-कडू हे आंदोलनस्थळी आल्यानंतर दोन मेंढ्याही आंदोलनात आणण्यात आल्या.
- प्रहारचे शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कीर्ती देशपांडे, शाहूराज चित्ते, डॉ. दीपक सुरी, गोविंदअप्पा डांगे यांनी आंदोलकांवर नियंत्रण ठेवले.
-क्रांती चौक ते शासकीय दूध डेअरी असा २०० मीटर अंतर मोर्चा काढण्यात आला. यापूर्वीचे आंदोलन लक्षात घेता पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
क्रांती चौकातून अमरप्रीत चौकात आल्यानंतर कडू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नंतर ते पोलिसांच्या स्वाधीन झाले.
-मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी चंदनाचा लेप बच्चू कडू यांच्या पायाला लावला.