- Marathi News
- सिटी क्राईम
- रस्त्याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसां...
रस्त्याने एकटे पाहून अनेकांची लूटमार केली, काल्डा कॉर्नरजवळील लुटीनंतर भरले दिवस, जवाहरनगर पोलिसांनी शोधासाठी जंगजंग पछाडले, अखेर तिघांना केली अटक!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा कॉर्नरजवळील घटनेने त्यांचे दिवस भरवले. जवाहरनगर पोलिसांनी जंगजंग पछाडत ३ लुटारूंच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांचा एक साथीदार फरारी असून, त्याच्या मागावर पोलीस आहेत.
पथक लुटारूंचा शोध घेत घेत मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पायलट बाबानगरी विमानतळाच्या भींतीसमोरील मोकळ्या मैदानात पोहोचले. तिथे लुटारूंपैकी दोघे मिळून आले. त्यात एक सौरभ मगरे व दुसरा विधीसंघर्ष बालक होता. पोलिसांना पाहून ते पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील दुचाकी, मोबाइल, चाकू जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज, २५ जुलैला दोन फरारी लुटारूंपैकी धनंजय जोगदंडला अटक करण्यात यश आले. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
आणखी एक लुटारूचा शोध सुरू आहे. या लुटारूंनी यापूर्वी गळ्याला चाकू लावून अनेकांची लूट केल्याची कबुली दिली. त्यात सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्याकडून एकूण १ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. लोहकरे, पोलीस अंमलदार शोन पवार, संदीप क्षीरसागर, वामन नागरे, महिला पोलीस अंमलदार अल्का रोकडे, पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी पार पाडली.