- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE : छळछावणी ‘विद्यादीप’मधील भयंकर प्रकार समोर : सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सो...
EXCLUSIVE : छळछावणी ‘विद्यादीप’मधील भयंकर प्रकार समोर : सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला सोडविण्यासाठी बालगृहातील सिस्टरने रचला कट!, अल्पवयीन मुलीला बालगृहात येऊन धमक्या!; व्हिडीओ दाखवायचे...

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छावणीतील विद्यादीप बालगृह मुलींसाठी कसे छळछावणी ठरले होते, हे यापूर्वी समोर आले आहे. या बालगृहातील ज्या सिस्टर कार्यरत होत्या, त्या मुलींना त्रास देत होत्याच, पण त्यांचे संगणमत गुन्हेगारांशीही असायचे. बलात्काराच्या गुन्ह्यानंतर पीडित मुलगी बालगृहात आणल्यानंतर गुन्ह्यातील आरोपीतांशी बालगृहातील सिस्टर संगणमत करून कट रचायच्या. १७ वर्षीय कीर्तीच्या (नाव बदलले आहे) कहानीवरून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. जी वाचल्यानंतर कुणाच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते.
कीर्तीला विद्यादीप बालगृहात ठेवण्यात आले होते. अशपाक शेख व त्याचा भाऊ महेमूद गफार शेख या दोघांशी कीर्तीचे रक्ताचे नाते नव्हते. तरीही महेमूद हा स्वतःला कीर्तीचा काका असल्याचे सांगून बाल कल्याण समितीची परवानगी न घेता विद्यादीप बालगृहात भेटायला यायचा. यासाठी त्याने बालगृहातील कमल सिस्टरसोबत संगणमत केले होते. त्याला भेटण्याची इच्छा नसतानादेखील कमल सिस्टर त्याची भेट कीर्तीसोबत घालून देत होती. महेमूद शेख व कमल सिस्टर हे कीर्तीला अशपाक शेखचे नाटकी व्हिडीओ दाखवून समजावून सांगत होते, की तू दाखल केलेल्या बलात्काराच्या केसमधून तुझ्या वडिलांना (सावत्र) निर्दोष सोडून टाक. बघ तुझ्या बापाची काय हालत झाली आहे, मी माझे घर विकले आहे. तुझे वडील जेलमधून बाहेर आल्यावर तुझा चांगल्याप्रकारे सांभाळ करतील. जर तू मी सांगितल्याप्रमाणे जबाब दिला नाही तर तुला जीवंत मारून टाकेन, अशी धमकीही महेमूद देत होता.
महेमूद गफार शेखच्या सांगण्यावरून कमल सिस्टर बाल कल्याण समितीला न कळवताच कीर्तीला छत्रपती संभाजीनगर सेशन कोर्टात खोटा जबाब देण्यासाठी घेऊन आली. महेमूद गफार शेखही तिथे होता. अशपाक शेखला पोलीस जेलमधून कोर्टात घेऊन आले होते. त्यावेळी महेमूद कीर्तीला म्हणाला, की "बघ तुझ्या वडिलांची काय अवस्था झाली आहे. आता त्यांना सोडून दे आणि तू केस मागे घेऊन टाक. कोर्टात सांग की, तुझे वडिलांसोबत काहीही संबंध झालेले नाहीत. वडील मला मारतील, याची भीती वाटल्याने मी वडिलांविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तू जर असे सेशन कोर्टात सांगितले नाही तर तुला मी मारून टाकेन, असे त्याने कोर्टातच धमकावले. त्यामुळे कीर्तीने कोर्टात खोटा जबाब दिला व सही केली. नंतर कीर्तीला परत विद्यादीप बालगृहात आणण्यात आले होते.
लगेचच दाखवले खरे रुप!
२५ जुलैला विद्यादीप बालगृहात महेमूद कीर्तीला भेटायला आला. त्यावेळेस महेमूद तिला म्हणाला, की तू कोर्टात अशपाक विरुद्धची बलात्काराची केस मागे घेण्यासाठी बयाण दिले आहे. आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही. आता मी तुला भेटायला कधीच येणार नाही. आता तू जर का जबाब बदलला तर तुला जीवंत मारून टाकेन, अशी धमकी देऊन महेमूद निघून गेला. त्यावेळी कमल सिस्टरदेखील तिथे होती, असे कीर्तीने जबाबात म्हटले आहे. ऑक्टोबर २०२३ पासून २५ मे २०२५ पर्यंत वेळोवेळी अशपाक शेखच्या सांगण्यावरून महेमूद गफार शेख (रा. भारतनगर गारखेडा परिसर) हा बालकल्याण समितीच्या परवानगीशिवाय कमल सिस्टरसोबत मिळून कट रचत विद्यादीप बालगृहात येत होता आणि कीर्तीला धमकावत होता. नाटकी व्हिडीओ दाखवून, जीवे मारण्याची धमकी देत दबाव टाकून कीर्तीला बलात्काराची केस मागे घ्यावी म्हणून कोर्टात खोटा जबाब देण्यास भाग पाडले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे करत आहेत.