- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- CSCN भूमिका : ‘पोलीस हाय हाय’ म्हणता, नाटकी आसवं आता दाखवताय, तुमच्याबद्दल कोणी ‘हाय हाय’ म्हणायचं?,...
CSCN भूमिका : ‘पोलीस हाय हाय’ म्हणता, नाटकी आसवं आता दाखवताय, तुमच्याबद्दल कोणी ‘हाय हाय’ म्हणायचं?, संभाजी कॉलनीतील ‘बघ्या’ नागरिकांचे रक्त त्यावेळी का पडले होते थंड??

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ६ मधील संभाजी कॉलनीत निमोने कुटुंबाने घडवलेल्या थराराने दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. किमान तसे दाखवले गेले. हीच सजगता, रोष, कर्तव्यपरायणता हल्ल्याच्या दिवशी का दाखवली गेली नसेल? हीच गर्दी, किमान त्यातले जास्त नाही, फार तर १० -१२ लोक जरी धावले असते तरी प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) यांचा जीव वाचला असता. नंतर गळा काढल्यापेक्षा संकटात वेळीच सर्वांनी धावून जायला पाहिजे होतं, अशी भावना शहरातून व्यक्त होत आहे. या हत्याकांडाला जसे निमोने कुटुंब जबाबदार आहे, तसे संभाजी कॉलनीतील हत्या होताना बघणारेही जबाबदार असल्याचे परखड मत आमचे आहे.
शनिवारी संभाजी कॉलनीतील नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या घटनेला पोलिसांची अक्षम्य बोटचेपी भूमिका कारणीभूत आहेच, पण घटना बघणारे त्यांच्यापेक्षा कमी दोषी आहेत का?, पोलीस प्रशासन हाय हाय असे म्हणणारी तीच तोंडं होती, जी शुक्रवारी दुपारी लपून बसली होती, नाहीतर निलाजरेपणाने सर्व थरार बघत होती. आक्रोश, संताप अन् हुंदके हा सर्व देखावा आता करून काय उपयोग आहे?
आधी संकटात धावून जा, मग बोलायला समोर या...
नक्षत्रवाडीत १० ऑगस्टला गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून पोटात चाकूने भोसकले होते. तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेकडोंचा जमाव हे भयानक दृश्य पाहत होता. गुंड निघून गेले तरी गंभीर जखमी तरुणाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याचे सौजन्य गर्दीने दाखवले नव्हते. शेवटी सातारा पोलीस घटनास्थळी आल्यावर कपड्याने त्याचे पोट बांधून त्यांनी तरुणाला रुग्णालयात नेले. असे प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात राजरोस घडत आहेत. गुन्हेगार इतके निष्ठूर, निर्भय झालेत याला कारण पोलिसांसोबत नागरिकही आहेत. भररस्त्यात, अगदी गर्दीतही जेव्हा चाकू चालतो, कुणी कुणाला मारहाण करते, तेव्हा बघणाऱ्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन ते का थांबवू नये? टवाळखोर, गुंड असतात किती, २, ४ किंवा फार फार तर १०... बघणारे, आजूबाजूला लोक किती मोठ्या संख्येने असतात... त्यांनी पोलिसांची प्रतीक्षा केल्यापेक्षा स्वतःच वज्रमूठ आवळली आणि एक-दोन घटनांत अशा गुंडांना वेळीच धडा शिकवला, तर किमान पुढचे वर्षभर तरी गुंडांचा असे काही करण्याआधी थरकाप उडेल... पण नागरिकांनी मनात ठरवून घेतले आहे, की ते काम पोलिसांचे आहे, कोण कायद्याच्या जंजाळात अडकेल, आपल्याला काय त्याचे, मरेना का तो... त्यांची ही भावना त्यांना असुरक्षिततेकडे घेऊन जात आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजेत.
स्वतःला विचारा का आले नाही मदतीला?
या घटनेनंतर रुद्राक्षची प्रतिक्रिया समाजासाठी मोठी शिकवण आहे. तो म्हणाला, की रस्त्यावर आजोबा, पप्पा रक्तबंबाळ अवस्थेत पडले. पण त्यांना उचलायला कोणी धावले नाही. ते वाचले असते. त्यांना मला एकट्याला गाडीवर नेण्याची वेळ आली. जे काही घडतंय, मी माझ्या कुटुंबासाठी खंबीर आहे. सर्वांनी स्वतःला विचारा का आले नाही मदतीला ? ऐनवेळी कोणाला गरज पडली तर संकटात धावून जा हो, घाबरू नका, असे १७ वर्षीय रुद्राक्ष म्हणाला.
पोलीस दोषी आहेतच...
पाडसवान कुटुंबाने गेल्या चार वर्षांत पोलिसांकडे ११ तक्रारी केल्या होत्या. शेवटची तक्रार ५ ऑगस्टला केली होती. मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे गांभीर्याने घेतली नाही आणि इतकी मोठी घटना घडली. शनिवारी (२३ ऑगस्ट) सकाळी ११ ते १:३० पर्यंत पाडसवान यांची पत्नी, नातेवाईकांसह नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत पोलिसांविरुद्ध रोष व्यक्त केला. पोलीस अधिकारी ठोस कारवाईचे आश्वासन देत होते. मात्र, तीन वर्षे कारवाई केली नाही. त्याने सोळा वार करत सर्वांसमक्ष माझे सौभाग्य संपवले, आता काय कारवाई करता, असे उद्वेग प्रमोद यांची पत्नी व्यक्त करत होती. पोलीस अधिकारी स्तब्ध झाले होते. प्रश्न असा आहे, की वेळीच पोलीस गांभीर्याने का घेत नाहीत? घटनेने टोक गाठावे, असे त्यांना वाटत असावे का? छोटे वाद वेळीच संपवले आणि कायद्याची जरब बसवली तर मोठ्या घटना घडणारच नाहीत. हे पोलिसांना सांगण्याची का गरज पडत आहे? शहरात गुन्हेगारी वाढतेय याला कारण पोलीस आहेत, कारण कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीच त्यांची आहे. ते ही जबाबदारी कर्तव्यनिष्ठेने पार पाडत नाहीत म्हणून अवघे शहर आज असुरक्षित भासत आहे. पोलिसांनीच आता एखादी चिंतन बैठक आयोजित करून राजकीय दबाव झुगारून गुन्हेगारी समूळ नष्ट कशी करता येईल, यावर ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.