छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परधर्मीय मुलीसोबत मैत्री करून प्रोझोन मॉलला फिरायला जाणे १७ वर्षीय मुलाला चांगलेच महागात पडले. टोळक्याने प्रोझोन मॉलसमोरून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने या मुलाचे अपहरण करत पडेगावच्या निर्जन डोंगरावर नेले आणि घेरून बेल्ट, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलिसांना अपहरणाची माहिती कळली असून, ते मुलाला शोधत असल्याचे कळताच टोळक्याने त्याला सोडून दिले. ही धक्कादायक घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी घडली.
अनिकेत (नाव बदलले आहे) मूळचा लोणार भायगाव (ता. अंबड जि. जालना) येथील असून, सध्या जयभवानीनगरात आई, वडिलांसोबत राहतो. त्याचे वडील मजुरी करतात. तो १२ वी उत्तीर्ण झालेला असून, आकाशवाणी चौकाजवळील एका क्लासेसमध्ये NEET ची तयारी करतो. सचिन (वय १७, नाव बदलले आहे) त्याचा सहावीपासूनचा मित्र असून तो JEE चे क्लास करतो. मंगळवारी दुपारी दीडला अनिकेत सचिनच्या घरी गेला. तिथून दोघे मोटारसायकलीने प्रोझोन मॉल येथे आले. प्रोझोन मॉलसमोर सचिनची मैत्रीण आलिया (नाव बदलले आहे) व तिची मैत्रीण आयरा (नाव बदलले आहे) आलेली होती. चौघे प्रोझोन मॉलमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत फिरले. खरेदी केली.
थोडे स्नॅक्स खाल्ले. नंतर प्रोझोन मॉल येथून सायंकाळी साडेपाचला बाहेर पडले. सचिन, त्याची मैत्रीण आलिया व तिची मैत्रीण आयरा हे तिघेही पायी चालत होते. अनिकेत गाडी घेऊन प्रोझोन मॉलसमोर त्यांच्यामागे होता. त्याच वेळी अचानक दोन मुले त्यांच्याकडील काळ्या स्पोर्टस् बाईकवरून आले. अनिकेतला म्हणाले, की तू त्या मुलीसोबत का बोलत व फिरत आहे? काय चालू आहे तुमचे? असे म्हणून एक जण अनिकेतच्या मागे बसला. दुसऱ्याने अनिकेतची गाडी चालवायला घेतली. अनिकेतला दोघांच्या मध्ये बसवून त्यांनी पिरॅमिड चौक सिडको एन १ चौकातून नेत असताना अनिकेतला मित्र सचिन दिसला. त्याने सचिनला आवाज दिला. त्याने अनिकेतकडे पाहिले, पण तोपर्यंत दोघांनी अनिकेतला सुसाट पळवून नेले.
सोबत समोर स्कुटी होती. मागे स्पोर्टस् बाईक होती. दोन्ही गाड्या मागे पुढे ठेवून अनिकेतला पाच ते सहा जणांनी त्याच्याच गाडीवरून पडेगाव येथील डोंगराकडे नेले. त्या ठिकाणी आधीच हजर असलेल्या दुसऱ्या एकाने त्याच्याकडील बेल्टने हातावर व अंगावर मारहाण सुरू केली. इतर दोन-तीन जणांनी हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने मारहाण करणाऱ्यांना समजले की, पोलीस अनिकेतचा शोध घेत आहेत. त्यामुळे त्यांनी रात्री ९ ला अनिकेतला हॉटेल अंबाई पॅलेस येथे गाडीसह सोडले. तिथून अनिकेत पिरॅमिड चौकात आला. तेथे त्याला घेण्यासाठी पोलीस आले. त्यांच्यासोबत सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन अनिकेतने अपहरण आणि मारहाण करणाऱ्या ८ ते ९ जणांविरुद्ध तक्रार दिली. अनिकेतला अपहरणकर्त्यांनी तू जर आमची पोलीस स्टेशनला तक्रार केली तर आम्ही तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. अनिकेतने पोलिसांना सांगितले, की मी हल्लेखोरांना यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. परंतु त्यांना बघितल्यानंतर ओळखू शकतो. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे करत आहेत.