छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे बळी गेला आहे. घाटी रुग्णालयाच्या चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतर सिडको पोलिसांनी या प्रकरणात डॉ. तपन निर्मल प्रदीप व डॉ. निर्मला आसोलकर या दोघांविरुद्ध गुरुवारी (२८ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे.
श्वेता वैभव खरे (वय २८, विश्रांतीनगर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रोड) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. श्वेता यांचे पती वैभव देविदास खरे (वय ३०, रा. विश्रांतीनगर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रोड) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून पुण्यात नोकरी करतात. त्यांचे लग्न श्वेता यांच्यासोबत २९ जुलै २०२१ रोजी झाले होते. लग्नानंतर ते पुण्यात राहिले. नंतर ऑगस्ट २०२४ मध्ये श्वेता या गरोदर असल्याने बाळंतपणासाठी त्या माहेरी आंबेडकरनगर येथे आल्या. त्यांनी ३ महिने कुशल मॅटर्निटी होम एन ७ बजरंग चौक येथे डॉ. तपन निर्मल प्रदीप व डॉ. निर्मला आसोलकर यांच्याकडे उपचार घेतले.
त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी श्वेता यांना प्रसुती कळा जाणवू लागल्याने कुशल मॅटर्निटी होममध्ये पती वैभव खरे यांनी नेले होते. तेथे डॉक्टांरानी तपासणी केली व सांगितले की, अजून डिलिव्हरीसाठी वेळ आहे. तुम्ही सायंकाळी घेऊन या. त्यानंतर वैभव हे श्वेता यांना घरी घेऊन आले. मात्र दुपारी प्रसुती वेदना जास्त वाढल्याने पुन्हा सायंकाळी साडेपाचला कुशल मॅटर्निटी होममध्ये नेले. त्यावेळी डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतले. त्याच दिवशी रात्री सव्वा नऊला डिलीव्हरी होऊन मुलगा झाला. जन्मावेळी माझा मुलामध्ये Cleft Lip & Cleft palt झाले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. श्वेता यांची प्रसुतीनंतर प्रकृती स्थिर होती. त्यांना ऑपरेशन रूमच्या बाजूच्या रूममध्ये हलवण्यात आले. त्यावेळी श्वेता या शुध्दीवर होत्या. रूममध्ये हलविल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी त्या बेशुध्द पडल्या.
वैभव यांनी ही बाब डॉक्टर व नर्सला सांगितली. त्यांची मेहुणी स्मिता सतिष राऊत, सासू अनिता सतिष राऊत, मेहुणा प्रशिक सतिष राऊत हे सुध्दा हजर होते. सर्वांनी सांगिल्यावर सुध्दा तेथील डॉक्टारांनी कुठलेही उपचार केले नाहीत. श्वेता या बेशुध्द पडल्यावर २५ ते ३० मिनिटांनी डॉ. तपन हे बघायला आले नाहीत. त्यानंतर डॉ. तपन आले. त्यामुळे प्रकृती अधिकच बिघडून श्वेता यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात ३१ ऑक्टोबरला रात्री साडेअकराला दाखल करावे लागले. मात्र तेथील डॉक्टारांनी ११ वाजून ४० मिनिटांनी श्वेता यांना तपासून मृत घोषित केले. श्वेता यांच्या मृत्यूबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या चौकशी समितीनेही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा अहवाल दिला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.