FULL STORY : पुंडलिकनगरात भल्या पहाटे अंगावर काटे : अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ गोणीत टाकून कचऱ्यात फेकले, कुत्र्यांचा हल्ला, गोणी बसखालीही येऊन गेली, पण तरीही देव तारी त्याला कोण मारी... बाळ सुरक्षित राहिले हो!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पतीपासून विभक्त राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने अनैतिक संबंधातून बाळाला जन्म दिला. नंतर हे बाळ गोणीत गुंडाळून रस्‍त्‍यावरील कचऱ्यात फेकून दिले. दोन कुत्र्यांनी गोणी ओढून बाळाचे लचके तोडण्याचा प्रयत्‍न केला. यात ही गोणी बसखालीही आली... पण बाळाचे आयुष्य बहुधा जास्त असावे, एवढ्या संकटातूनही बाळ वाचले अन्‌ बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून एका सतर्क नागरिकाने कुत्र्यांना हाकलून लावत नागरिकांना जमा केले. त्यानंतर गोणी उघडली असता त्यात चक्क रक्‍तबंबाळ बाळ दिसले... अंगावर काटे आणणारी ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे साडेपाचला पुंडलिकनगर- गजानन महाराज मंदिर रस्त्यावर समोर आली.

पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी पत्रकारांना घटनेची माहिती दिली. कडा कार्यालयात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भाग्येश पुसदेकर (वय २८, मूळ रा. अंजनगाव सुर्जी, अमरावती, ह. मु., पुंडलिकनगर) गुरुवारी पहाटे साडेचारला गावावरून छत्रपती संभाजीनगरला आले. सिडकोतील वसंतराव नाईक चौकातून पायीच घराकडे निघाले होते. साडेपाच वाजता ते पुंडलिकनगरमधील मुथूट फायनान्स कार्यालयाजवळ आले असता तिथे दुभाजकावरील कचऱ्यात असलेल्या गोणीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांचे लक्ष वेधले गेले. ती गोणी कुत्रे ओढत होते. भाग्येश यांनी लगेचच आरडाओरड करून नागरिकांना जमवले. सर्वांनी मिळून कुत्र्यांना हाकलले. नंतर गोणीची गाठ सोडली असता त्यात चक्क रक्तबंबाळ नवजात बाळ दिसले.

baby2
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली तरुणी, दुसरे छायाचित्र भाग्येश पुसदेकर यांचे, ज्‍यांच्यामुळे बाळ वाचू शकले... भाग्येश हे दुर्लक्ष करून जाऊ शकले असते, पण त्‍यांच्या माणुसकीमुळे बाळाला जीवदान मिळाले!

ते पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. जवळच राहणाऱ्या एका आजीने तत्काळ चादर आणून त्या बाळाला गुंडाळले. बाळाला गजानन महाराज मंदिर परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या खासगी रुग्णालयाने उपचारास नकार दिल्याने बाळाला घाटी रुग्णालयात आणण्यात आले. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले, की बाळाचे वजन चांगले असून, बाळ निरोगी आहे. अंगावर बऱ्याच जखमा आहेत. कुत्र्यांचे दातही लागले आहेत. त्‍यामुळे रेबिजचे इंजेक्शन दिले आहे. सध्या बाळाची प्रकृती चांगली आहे. २-३ दिवसांत बाळ पूर्णपणे बरे होईल.

कपडे अन्‌ उंच टाचेच्या सँडलवरून पोलिसांनी तरुणीला शोधले...
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, अर्जुन राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे ३:३० वाजता एक तरुणी बाळ फेकून एका बोळीत जाताना कैद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार संदीप बिडकर, विलास सोळंके, प्रशांत नरवडे, स्वाती राठोड, गिरिजा आंधळे, अजय कांबळे यांनी आसपासच्या परिसरात, ४० हून अधिक घरांत शोध घेतल्यावर भाड्याने राहणाऱ्या क्रूर तरुणीची माहिती समोर आली. तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्‍यात घेतल्यावर तिने कृत्‍याची कबुली दिली.

तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. कपडे आणि उंच टाचेच्या सँडलवरून पोलिसांनी तिला बरोबर हेरले होते. ही २४ वर्षांची तरुणी मूळची वाशिमची असून, बारावीपर्यंत शिकलेली आहे. दीड वर्षापूर्वी पतीने तिला सोडले. त्यानंतर ती खासगी कंपनीत काम करून पुंडलिकनगरमध्ये एकटीच राहते. खोलीत एकटीनेच बाळाला जन्म दिल्याचा दावा तिने केला आहे. मात्र पोलीस तिच्या या दाव्यावर समाधानी नाहीत. तिच्या कृत्‍यात कुणी सहभागी आहेत का, याचा तपास करत आहेत. १४ ऑगस्ट रोजी तिने खरेदी केलेल्या औषधीची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली.

देव तारी त्‍याला कोण मारी...
बाळाचे नशीब खूपच बलवत्तर आहे. क्रूर मातेनेच त्‍याला कचऱ्यात फेकल्यानंतरही ते इतके सुरक्षितरित्‍या वाचले. भाग्येश पुसदेकर यांनी धाव घेईपर्यंत बाळ असलेली गोणी कुत्र्यांनी फाडण्याचा प्रयत्न केला होता.  ओढाताणीत गोणी रस्त्यावर येऊन एका कंपनीच्या बसच्या दोन्ही चाकांच्या मध्ये आली होती. बाळाच्या छातीला कुत्र्यांचे दोन दात लागले आहेत. सुरुवातीला क्रूर तरुणीने बाळाच्या जन्मास व फेकल्याला नकार दिला होता. मात्र पोलिसांनी तिला सीसीटीव्ही फूटेज दाखवल्यावर ती ओक्साबोक्सी रडू लागली. तरुणीची ओळख एका तरुणासोबत झाल्यानंतर दोघांत शारीरिक संबंध घडून आले. त्यातून ती प्रेग्‍नंट झाली. हा प्रकार घरी कळू नये म्‍हणून तिने स्वतःच स्वतःची प्रसुती केली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल मोठी बातमी : सिडको एन ७ मधील कुशल मॅटर्निटी होममध्ये डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर विवाहितेचा मृत्‍यू, दोन्ही डॉक्‍टरांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ७ बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी होममध्ये २८ वर्षीय विवाहितेचा प्रसुती झाल्यानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या...
मनपाच्या प्रभाग रचनेवर आक्षेपांचा पाऊस!, ४ दिवसांत १४ तक्रारी..., काय होताहेत आरोप जाणून घेऊ...
अगरबत्ती विक्री करताना संशयास्पद हालचाली, पोलिसांनी पकडले तर खिशात निघाला चोरीचा मोबाइल!, जवाहरनगर पोलिसांची कामगिरी
नवीन फोन खरेदी केल्यानंतरही कॉल हिस्ट्री होणार नाही डिलीट
बारावीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्सची कन्सेप्ट क्लिअर करणे होणार सोपे; NCERT ने आणलाय मोफत ऑनलाइन कोर्स
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software