- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE : ACB च्या ट्रॅपमधून शेवटच्या क्षणी PSI मुंढे कसे वाचले?, हवालदार शेखला एकट्यालाच भोवली ला...
EXCLUSIVE : ACB च्या ट्रॅपमधून शेवटच्या क्षणी PSI मुंढे कसे वाचले?, हवालदार शेखला एकट्यालाच भोवली लाचखोरी!!, सिडको MIDC पोलीस ठाण्यात नक्की काय घडलं...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एसीबीच्या ट्रॅपमध्ये पोलीस हवालदार अडकला, पण ज्यांच्यासाठी लाच दिल्याचा दावा शेतकऱ्याने तक्रारीत केला, ते पोलीस उपनिरीक्षक लाच मागणीच्या पडताळणीत लाचेबद्दल काहीच न बोलल्याने बचावले. दुसरीकडे पोलीस हवालदार हैदर शेख मात्र बोलून, पैसे घेऊन फसला. शेतकऱ्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचे झेंगट संपविण्यासाठी २० हजार रुपये मागण्यात आले होते. त्यातले १० हजार दिले होते, उरलेल्या दहांतही ५ हजारांची सूट शेखने दिली होती. ५ हजार रुपये घेताना मात्र एसीबीने रंगेहात पकडले...
या प्रकरणात ४१ वर्षीय शेतकऱ्याने जालना एसीबीकडे तक्रार केली होती. शेतकरी, त्यांची चुलत बहीण व आणखी एक अशा तिघांविरुद्ध २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांच्याकडे आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांनी बोलावल्याने शेतकरी १४ ऑगस्टला पोलीस ठाण्यात आला. त्याने मुंढे यांच्याबाबत विचारपूस केली असता त्या ठिकाणी पोलीस अंमलदार हैदर शेख भेटला. त्याने शेतकऱ्याला सांगितले की, मुंढे हे चिकलठाणा विमानतळ पार्किंग परिसरात बंदोबस्तासाठी गेलेले असून माझ्यासोबत चला मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. त्यामुळे हैदर शेखसोबत शेतकरी व त्याचा मित्र गेले.
चिकलठाणा विमानतळ पार्किंग परिसरात जाऊन पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांना भेटले. त्याठिकाणी मुंढे यांनी शेतकऱ्याला गुन्ह्यात बी फायनल करण्यासाठी आधी ३० हजार रुपये मागितले. नंतर तडजोडीअंती २० हजार रुपये रोख मागितल्याचे तक्रारीत शेतकऱ्याने म्हटले आहे. १७ ऑगस्टला शेतकऱ्याच्या राहत्या गावी शेवगा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे मुंढे व हैदर शेख जबाब घेण्यासाठी आले होते. जबाब नोंदवून झाल्यानंतर त्यांना शेतकऱ्याने हसनाबाद वाडी शिवारातील जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील हॉटेल राजपूत येथे जेऊ घातले. त्यानंतर १८ ऑगस्टला पोलीस ठाण्यात येऊन पोलीस उप निरीक्षक मुंढे यांच्या सांगण्यावरून हैदर शेखकडे कॅश दहा हजार रुपये दिल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे.
मुंढे यांनी बाकी राहिलेल्या पैशांबाबत विचारले असता शेतकऱ्याने सांगितले की, सध्या माझ्याजवळ पैसे नाहीत. मी दहा- पंधरा दिवसांत पैशांची सोय करतो. त्यावेळी मुंढे म्हणाले, की पैशांची सोय झाल्यानंतर बाकी राहिलेले साक्षीदार जबाबासाठी पोलीस ठाण्यात घेऊन या. तेव्हा राहिलेले दहा हजार रुपये कॅश स्वरुपात देऊन टाका, असे सांगितले. २९ ऑगस्टला हैदर शेखला शेतकऱ्याने कॉल करून साक्षीदार घेऊन येऊ का, असे विचारले असता त्याने ३१ ऑगस्टला येण्यास सांगितले. मात्र शेतकऱ्याला आणखी लाच देण्याची इच्छा नसल्याने जालना एसीबीकडे तक्रार केली. पोलीस उप निरीक्षक मुंढे व पोलीस हवालदार हैदर शेख लाच मागत असल्याचे त्यांना सांगितले.
लाचेच्या मागणीत मुंढे बोलले नाहीत, पण शेख अडकला...
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर यांनी लाचखोरांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्याआधी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. व्हाईस रेकॉर्डर मशीनमध्ये नवीन मेमरी कार्ड टाकून मशीन शेतकऱ्याच्या शर्टाच्या आतून अडकवले. शासकीय पंचासोबत शेतकऱ्याला मुंढे व हैदर शेख यांना भेटण्यासाठी पाठवले. पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका हॉलमध्ये पोलीस उप निरीक्षक मुंढे यांची भेट घेतली. शेतकरी व मुंढे यांच्यात चर्चा झाली. दोघे चर्चा करत असताना तिथे हैदर शेख आला. त्यावेळी मुंढे यांनी फाईल घेऊन जा, असे हैदर शेखला सांगितले. सर्वजण बोलत बोलत मुंढे यांच्या कक्षात गेले. तेव्हा मुंढे यांनी शेतकऱ्याच्या कामासंबंधीची फाईल हैदर शेखकडे देऊन ते ओकेच झालं पाहिजे, असे सांगितले. त्यावर हैदर शेख ओकेच करूया सर, यांना न्याय देऊ सर... आपल्याला वाईट नाही तं चांगलं तं करता येईल ना, असे म्हणाला. त्यानंतर मुंढे तेथून निघून गेले. लाच मागणीच्या पडताळणीवेळी मुंढे यांनी पैशांची मागणी केली नाही. त्यामुळे मुंडे एसीबीच्या कारवाईत सापडले नाहीत.
शेतकरी व शासकीय पंच हे हैदर शेख याच्यासोबत बोलत बोलत त्याच्या कक्षात गेले. तिथे चर्चेदरम्यान हैदर शेख म्हणाला, की तुम जो बोलेंगे तुम जो देगें ओ बिस्मिल्ला है बस, वरना नाराज नही करते अपुन भी, उनको पटाने का ओ अपना काम है, दे दे कें फ्री कर दो, असे म्हणाला. त्यावर शेतकरी म्हणाला, की फोन पे है, कॅश नहीं... त्यावर हैदर शेख म्हणाला, लेके आजाव, खुश कर देगें. त्यावर शेतकऱ्याने कित्ते लावू?, पहिले दस दिये अब कित्ते देऊ, असे विचारले. त्यावर हैदर शेख म्हणाला, एक काम करो दस दिये है ना, और ५ हजार दे दो... पंधरा में खतम हो जाता ठिक है... आव कबतक आरे? त्यावर शेतकऱ्याने म्हटले, की लाते लगेच, घंटा भर के अंदर आता, असे म्हणून शेतकरी हा शासकीय पंचासोबत प्रोझोन मॉलकडे परतला. जिथे एसीबीचे पथक थांबलेले होते. व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले संभाषण जाधवर यांनी ऐकले.
असा पकडले रंगेहात...
हैदर शेखला जाळ्यात पकडण्यासाठी एसीबीने सिडको पोलीस ठाण्यात सापळा रचण्याचे ठरवले. लाच देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या नोटांना ॲथ्रासीन पावडर लावण्यात आली. पावडर लावलेल्या नोटा पॅन्टच्या समोरील उजव्या खिशात शेतकऱ्याने ठेवल्या. पोलीस उपअधीक्षक जाधवर यांनी सर्वांना सूचना करून शेतकऱ्याला रवाना केले. एसीबीचे पथकही लगेचच पोलीस ठाण्याकडे आले. ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या हॉलमधील शेखच्या कक्षात जाऊन शेतकरी भेटला. शेखने रख दो वहा, असे म्हणून त्याच्या टेबलचा ड्रावर उघडला. शेतकऱ्याने लाचेची रक्कम त्या ड्रावरमध्ये ठेवली अन् त्याचवेळी शेतकऱ्याने एसीबी पथकाला डाव्या हाताने रुमाल काढून तोंड पुसून खांद्यावर ठेवण्याचा इशारा केला अन् एसीबी पथकाने लगेचच हल्लाबोल करत शेखला रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अंगझडतीत ३ हजार ३५० रुपयांची रोख रक्कम सापडली. अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.
काय आहे बी फायनल?
पोलीस तपासात आरोपी किंवा गुन्ह्याचा कोणताही पुरावा आढळला नाही तर तो गुन्हा बंद करण्यासाठी अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्याच्या प्रक्रियेला बी फायनल असे म्हणतात. हा अहवाल स्वीकारल्यानंतर न्यायालय तो गुन्हा कायमचा बंद करते. यासाठी शेतकऱ्याला लाच मागण्यात आली होती. आता या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांचे नाव आल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास काढून घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.