- Marathi News
- सिटी क्राईम
- खळबळजनक : कुख्यात गुंड मुकेश साळवेचा क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये राडा!
खळबळजनक : कुख्यात गुंड मुकेश साळवेचा क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये राडा!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १७ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड मुकेश महेंद्र साळवे (वय २८, रा. महादेव मंदिराजवळ, मुकुंदवाडी) याने क्रांती चौक पोलीस ठाण्यात शुक्रवारी (५ सप्टेंबर) दुपारी २ च्या सुमारास मोठाच राडा केला. लॉकअपमध्ये स्वतःचे डोके आपटून घेत, शर्टने गळफास घेत आत्महत्येचाही प्रयत्न केला. पोलिसांशीही झटापट केली.
मुकेश साळवे कुख्यात गुन्हेगार...
मुकेश साळवे याच्याविरुद्ध १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने २ सप्टेंबरला सकाळी मुकुंदनगरातील बाळू मकळे (वय २८) या तरुणावर दीड फूट लांब चाकूने प्राणघातक हल्ला चढवल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुकेशला अटक केली आहे. बाळू हल्ला करताना त्याने मी मुकुंदवाडीचा दादा... माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत धमकावले होते. विशेष म्हणजे, मुकेशने काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रिशियनवर प्राणघातक हल्ला केला होता. त्याला ८ टाके पडले. मात्र, पोलिसांत तक्रार करू नये म्हणून मुकेशने त्याला रुग्णालयात जाऊन धमकावले होते. त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार केली नव्हती. मार्चमध्ये मुकेश साळवेसह विकी ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे (वय ३३), बालाजी पिवळ (वय ३२) या टोळक्याने अन्य साथीदारांच्या मदतीने एका व्यापाऱ्याला खंडणी मागून प्राणघातक हल्ला केला होता. गोळीबारही केला होता. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. मुकेश साळवे आणि त्याची गँग ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या शस्त्रांसह छायाचित्रे, व्हिडीओ बनवून टाकतात. त्याद्वारे ते दहशत पसविण्याचा प्रयत्न करतात. मात्र शहराच्या सायबर पोलीस टीमचे याकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.