- Marathi News
- जिल्हा न्यूज
- पती-जाऊला एकत्र झोपलेले विवाहितेने पाहिले अन्... पैठणच्या रांजणगाव खुरीत जे घडलं ते धक्कादायक, ३१ व...
पती-जाऊला एकत्र झोपलेले विवाहितेने पाहिले अन्... पैठणच्या रांजणगाव खुरीत जे घडलं ते धक्कादायक, ३१ वर्षीय सुनिताच्या आत्महत्येचे गूढ उकलले...

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पती-जाऊचे अनैतिक संबंध डोळ्यांनी पाहिल्यावर धक्का बसलेल्या ३१ वर्षीय विवाहितेने जाब विचारला. त्यावर पतीने बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा दोघांकडून छळ केला जाऊ लागला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन शुक्रवारी (८ ऑगस्ट) दुपारी सव्वाचारच्या सुमारास आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे घडली. बिडकीन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती आणि जाऊविरुद्ध शनिवारी (९ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पैठण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सुनिताचे पहिले लग्न वडाळी (ता. गंगापूर) येथील एकाशी झाले होते. तिचा पती सन २०१९ मध्ये वारला. त्यानंतर ती माहेरी राहत होती. मे २०२३ मध्ये सुनिताचे दुसरे लग्न विठ्ठल पांडुरंग करडे (रा. रांजणगाव खुरी) याच्याशी झाले होते. तेव्हापासून सुनिता पती विठ्ठलसोबत रांजणगाव खुरी येथे राहत होती. त्यांच्या घरालगत सुनिताची सासू, सासरे, दीर व जाऊ पुष्पा राहत होते. जावई विठ्ठल शेतीकाम व कपाशी, कांद्याचा व्यापार करत होता. सुनिताकडे मोबाइल फोन नव्हता. सुनिताला दुसऱ्या पतीपासून मुलगी गौरी (वय ११ महिने) झाली. १० मे २०२५ रोजी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सुनिता माहेरी आली होती. सुनिताने आई-वडिलांना सांगितले, की पती विठ्ठल करडे व त्यांची भावजय पुष्पा यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध असून त्या दोघांना तिने घरात एकत्र झोपलेले पाहिले असल्याचे सांगितले. तिने याबद्दल पतीला जाब विचारला असता तिच्या पतीने तिला मारहाण केल्याचे सांगितले.
मे २०२५ मध्ये सुनिताच्या आई-वडिलांनी रांजणगाव खुरी येथे जाऊन जावयाची समजूत काढली. त्यानंतर सुनिताला माहेरी लोणी बुद्रूक येथे घेऊन आले होते. नंतर पुन्हा आठ दिवसांनी जावई विठ्ठलने सुनिताला रांजणगाव खुरी येथे नेले होते. जुलै २०२५ मध्ये सुनिताने वडिलांना कॉल करून सांगितले की, माझी तब्येत बरी नाही. मला घ्यायला या... त्यामुळे तिचे वडील तिला घ्यायला गेले. जावई विठ्ठलने सुनिताला गंगापूरपर्यंत आणून सोडले. वडील तिला लोणी बुद्रूक येथे घेऊन आले. सुनिताने घरी आल्यावर सांगितले, की विठ्ठल व पुष्पा यांचे प्रेमसंबंध असल्याचे माहीत झाल्यामुळे ते तिला नेहमी मारहाण करतात. जाऊ पुष्पाही तिच्यासोबत नेहमी भांडण करते.
८ ऑगस्टला उचलले टोकाचे पाऊल...
१ ऑगस्टला सुनिताचे सासरे पांडुरंग व पती विठ्ठल सुनिताला घ्यायला आले. त्यावेळी तिच्या वडिलांनी दोघांनाही सुनिताला त्रास देऊ नका, अशी समजावून सांगितले. सुनिताला पुन्हा त्यांनी सासरी नेले. ८ ऑगस्टला दुपारी सव्वा चारला सुनिताचे सासरे पांडुरंग करडे यांनी कॉल करून सांगितले, की सुनिताने घरात गळफास घेतला असून तिने दरवाजा आतून लावून घेतलेला असल्यामुळे तिची मुलगी गौरी रडत आहे. सुनीता मरण पावली आहे, असे सांगितले. त्यामुळे सुनिताचे वडील, भाऊ आणि नातेवाइक तातडीने रांजणगाव खुरी येथे आले. सुनिताला बिडकीनच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सायंकाळी पाचला तपासून मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करत आहेत.