- Marathi News
- जिल्हा न्यूज
- सोयगावमध्ये टवाळखोरांचा कहर : आधी मुलीला त्रास, जाब विचारणाऱ्या पित्याला फायटर, लाथाबुक्क्यांनी म...
सोयगावमध्ये टवाळखोरांचा कहर : आधी मुलीला त्रास, जाब विचारणाऱ्या पित्याला फायटर, लाथाबुक्क्यांनी मारहाण!
On

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव शहरात टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून, शाळकरी मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींना एकटेदुकटे पाहून अश्लील शेरेबाजी करणे, विरोध केल्यास शिवीगाळ करून छेड काढण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर हे टवाळेखोर मुलींना टार्गेट करत असतात. एका मुलीला त्रास दिल्यानंतर तिचे वडील जाब विचारण्यासाठी गेले असता टवाळखोरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, फायटरने बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (२१ जुलै) दुपारी १ च्या सुमारास घडली.
मुलीचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी सोयगावच्या जिल्हा परिषद शाळेत दहावीत शिकते. सोमवारी सकाळी दाम्पत्य शेतात कामाला गेले होते. दुपारी १२ ला त्यांना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने कळवले, की तुमच्या मुलीला काही मुले त्रास देत आहेत. त्यामुळे मुलीचे वडील शेतातून जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर मुलीला भेटण्यासाठी आले. तेव्हा गेटसमोर अक्षय औरंगे, वैभव लवठे, प्रथमेश निकम, शुभम सैंदाने, राहुल लवटे ही टवाळखोर मुले होती. मुलीच्या वडिलांनी अक्षला जाब विचारला असता त्याने मुलीच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या मदतीला त्यांचा मित्र आला असता त्यालाही अक्षयने खिशातून फायटर काढून डोक्यात मारून दुखापत केली. वैभव, प्रथमेश, शुभम, राहुल या सर्वांनी मिळून मुलीचे वडील आणि त्यांच्या मित्राला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करून तुम्ही आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार राजू बर्डे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
25 Jul 2025 22:12:45
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रस्त्याने एकट्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लुटायचे. सिडको एमआयडीसी, जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनेकांना लुटल्यानंतर काल्डा...