३०० पोलिसांच्या बंदोबस्तात नारेगावमध्ये १७५ मालमत्तांवर चालला बुलडोझर, वाळूज एमआयडीसीतील ५५० अतिक्रमणे उद्‌ध्वस्त

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३०० पोलिसांचा फौजफाटा घेऊन महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक सोमवारी (४ ऑगस्ट) सकाळी अचानक नारेगावमध्ये धडकले. ३० मीटर मुख्य रस्‍त्‍यासाठी दोन आठवड्यांपूर्वी महापालिकेने टोटल सर्व्हे स्‍टेशन केले होते, मात्र मार्किंग केली नव्हती. त्‍यामुळे नागरिकांनी विनामार्किंग पाडापाडी कशी करणार, असा सवाल करत तीव्र विरोध सुरू केला. महापालिकेने युद्धपातळीवर मार्किंग करून दुपारी अडीचनंतर लगेचच बाधित मालमत्तांवर बुलडोझर चढवला. सायंकाळी ७ पर्यंत १७५ मालमत्ता भूईसपाट करण्यात आल्या.

नारेगावचा मुख्य रस्ता १०० फूट रूंद आहे. यापूर्वी स्वतःहून नागरिकांनी मालमत्ता काढून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. सोमवारी सकाळी १० ला पथक कारवाईसाठी आले तेव्हा १ पोलीस उपायुक्‍त, १ सहायक पोलीस आयुक्‍त, ४ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस अंमलदार, दंगा काबू पथक, शीघ कृती दलाचे जवान असा ३०० पोलिसांचा मोठा फौजफाटा सोबत आणलेला होता. त्‍यामुळे मालमत्ता धारकांच्या काळजात धस्‍स झाले. नागरिकांनी अगोदर मार्किंग करून देण्याचा आग्रह केला.

त्‍यामुळे महापालिकेने मार्किंग केले. त्‍यानंतर पाडापाडी सुरू झाली. नारेगाव चौक ते कचरा डेपोकडे जाताना डाव्या बाजूला बहुतांश दोन ते तीन मजली इमारती बाधित होत होत्या. रस्‍त्‍याचे अलाइनमेंट पुढे नाल्याजवळ उजवीकडे जास्‍त सरकलेले होते. त्‍यामुळे मालमत्ताधारकांनी आमचा भाग जास्‍त घेत असल्याचा आरोप करत विरोध केला. मोठा जमाव पथकावर चालून आल्याने बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी संयम बाळगून कारवाई पुढे रेटली. या कारवाईदरम्‍यान बघ्यांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.

वाळूज एमआयडीसीत ५५० अतिक्रमणांवर चालला बुलडोझर
वाळूज एमआयडीसीतील सार्वजनिक भूखंडांवर वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सोमवारपासून (४ ऑगस्‍ट) सकाळी १० पासून हाती घेण्यात आली. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. बजाजनगर येथील आंबेडकर चौकातून कारवाईला सुरुवात झाली. अनधिकृत बांधकामांसह टपऱ्या, शेड्‌स आणि दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला. बजाजनगरातील राजे शिवाजी शाळेच्या एकूण ३० खोल्या अनधिकृत असल्याने पाडण्यात आल्या. सध्या बजाजनगरात कारवाई केली जात असून, पुढच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीतील इतर सेक्‍टरमध्ये कारवाई होणार आहे. सोमवारी आंबेडकर चौक ते कोलगेट चौक रोडवरील अतिक्रमण, त्यानंतर आम्रपाली बुद्धविहार परिसरातील अतिक्रमणे, महादेव मंदिर परिसर, विठ्ठल- रुख्मिणी मंदिर परिसर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, हायटेक कॉलेजसमोरील मोकळ्या जागेवरील टपऱ्या, मोरे चौकातील गुरुदेव सेवा मंडळात असलेली शाळा, पंढरपूर येथील भाजीमंडीतील अतिक्रमणे हटविण्यात आली. आज मंगळवारीही कारवाई सुरूच राहणार आहे.

हर्सूलमध्ये बैठक
हर्सूलमध्ये नागरिक आणि धर्मगुरूंची बैठक इदगाह मैदानावर झाली. रस्‍त्‍यात बाधित होणाऱ्या जागा देण्यास विरोध नाही, पण महापालिकेने अगोदर भूसंपादनाची नोटीस द्यावी. नंतर पुढील प्रक्रिया करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. जागा ताब्‍यात घेण्यापूर्वी पंचनामे करण्याची मागणीही करण्यात आली.

कांचनवाडीतील नागरिक उपोषण करणार
कांचनवाडीतील रहिवाशांनी पोलीस आयुक्‍तांना निवेदन देत महापालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध ६ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. आरोपांनुसार, नाथव्हॅली रोड गट क्र. १० व ११ मधून जातो. मात्र १८ मीटर रस्‍ता केवळ गट क्र. १० मधून करण्यात येत आहे. गट क्र. ११ मधील काही मालमत्ता वाचविण्यासाठी ४०० मालमत्ता पाडण्यात येत आहेत. गट क्र. ११ मधील काहींनी गट क्र. १० मधून रस्‍ता वळविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोन्ही गटांतील मध्य रेषा धरून दोन्ही बाजूंनी प्रत्‍येकी ९ मीटर रस्ता रूंद करावा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...

Latest News

हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे... हद कर दी... शहानूरवाडीत थारला बेल्ट बांधून थेट एटीएम उखडून नेण्याचा प्रयत्‍न!;  बेल्ट तुटल्याने मोठा आवाज अन्‌ पळाले चोरटे...
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थार गाडीला बेल्ट बांधून एटीएम यंत्र थेट उखडून नेण्याचा प्रयत्‍न फसला. मध्येच बेल्ट तुटला अन्‌...
कृषी खात्‍यातील वरिष्ठ लिपिकाची गोदापात्रात उडी घेऊन आत्‍महत्‍या, चार महिन्यांपूर्वी झाले होते लग्‍न, गंगापूर तालुक्‍यातील धक्कादायक घटना
लाचखोर तलाठी अक्षय बिनीवाले, कोतवाल सोमनाथ कोल्हे ACB च्या जाळ्यात!, पैठण तहसील कार्यालयात कारवाई
हे असे आंदोलन योग्य आहे? : वसतिगृहात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या, त्‍यामुळे रात्रीची तपासणी, काही विद्यार्थी रात्री एक-दोनला येतात, त्‍यामुळे १० नंतर नो एंट्री!; विधी विद्यापीठ झाले सक्‍त, पण रूचली नाही ‘शिस्त’!!'; विद्यार्थ्यांचे आंदोलन
छ. संभाजीनगरात पतीपासून विभक्‍त राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीवर वकिलाचा वारंवार बलात्‍कार!, दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपातही करवला!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software