छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नागेश्वरवाडीतील सर्व मांगल्ये गोल्ड वर्कशॉप व ऋत्विका ज्वेलर्सच्या मालकाला कारागिराने ८ लाख ७० हजार रुपयांचा चुना लावला. त्याच्याकडे मालकाने सोन्याची लगड दागिने बनविण्यासाठी दिली होती. त्याने लगड घेऊन पोबारा केला. महिनाभर त्याच्या मूळगावी चकरा मारल्यानंतर अखेर सोमवारी (२१ जुलै) क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रमेश श्रीकांत रेवणकर (वय ४३, रा. नागेश्वरवाडी, शेवतेकर हॉस्पिटलमागे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे नागेश्वरवाडीतच सर्व मांगल्ये गोल्ड वर्कशॉप व ऋत्विका ज्वेलर्स दुकान आहे. त्यांच्याकडे एकूण ९ बंगाली कारागीर आहेत. त्यांना ते सोन्याचे दागिने बनविण्याचे काम देत असतात. सर्व कामगार रेवणकर यांच्या घरात पहिल्या मजल्यावर राहतात. तेथेच सोन्याचे दागिने बनवतात.
रेवणकर यांनी १५ जून २०२५ रोजी दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान कारागीर समर मिताई मल्लीक (वय २४, रा. महानात, हरमाला, पुलवा पोस्टे जि. हुघली, कोलकत्ता, पश्चिम बंगाल) याला ८तोळे ८ ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची लगड देऊन ऑर्डरप्रमाणे कानातील टॉप्स बनविण्यासाठी दिले होते. मात्र त्याने सोन्याचे दागिने बनवून दिले नाही. १७ जूनला रात्री ११ च्या सुमारास इतर कारागीर बुबई व प्रसेनजित यांनी सांगितले की, समर मल्लीक याने जेवण तयार केले नाही. तो संध्याकाळी ६ पासून चहा पिण्यासाठी गेला.
आतापर्यंत परत आला नाही. त्यामुळे रेवणकर यांनी तातडीने पहिल्या मजल्यावर जाऊन समर मल्लीक यांचा कारागिरी काम करण्याचा टेबल, ड्रॉवर चेक केला असता त्यात सोन्याची लगड अथवा सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यानंतर रेवणकर व इतर कारागिरांनी समर मल्लीकचा मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन भागात शोध घेतला. मात्र मिळून आला नाही. कारागिरांच्या दोन मित्रांना पश्चिम बंगाल येथील समर मल्लीक याच्या मूळ गावी पाठविले. तिथेही तो मिळून आला नाही. एक महिना मल्लीकचा पाठपुरावा केला. अखेर सोमवारी (२१ जुलै) रेवणकर यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात मल्लीकची तक्रार केली. त्याने आठ लाख ७० हजार रुपयांची किंमतीची ८ तोळे ८ ग्रॅम वजनाची २४ कॅरेट सोन्याची लगड चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी मल्लीकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.