छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री सव्वा नऊनंतर पद्मपुऱ्यातील होळकर चौक ते पंचवटी चौक, कार्तिकी सिग्नल, बंडू वैद्य चौक आणि समर्थनगरातील सावरकर चौकापर्यंत सुसाट स्विफ्ट कारने हल्लकल्लोळ माजवला. आधी महिला आणि एका मुलीला धडक देऊन जखमी केले. नंतर दोन कार, दोन दुचाकी उडवत आणखी दोघांना जखमी केले. समर्थनगरात ही कार पकडण्यात नागरिकांना यश आले. त्यानंतर नागरिकांनी मद्यधुंद कारचालकाला बेदम चोप देत क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.
संकेत शंकर अंभोरे (वय २८, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे मद्यधुंद कारचालकाचे नाव असून, तो प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांचा तो मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकाश राजू कटारे (वय ३३, रा. मोची मोहल्ला पदमपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांच्या गल्लीतील गोकुळ अष्टमी उत्सवाचा भंडारा कार्यक्रम संपवून प्रकाश यांच्यासह रोहिदास बताडे, श्याम रमंडवाल, विक्की बताडे असे गल्लीतील रोडवर गप्पा मारत उभे होते. त्यांच्यासमोर संत तुकाराम होस्टेलसमोर त्यांच्याच गल्लीतील महिला अनसाबाई भागीरत बरंडवाल आणि एक लहान मुलगी नाव माहीत नाही अशा दोघी पंचवटी दिशेला रस्त्यावरून चालत जात होत्या.
अचानक अहिल्याबाई होळकर चौकातून पंचवटी दिशेला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार भरधाव आली. त्या कारने अनसाबाई बरंडवाल आणि लहान मुलीला जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. कारचालक वेगाने पंचवटीच्या दिशेने निघून गेला. प्रकाश कटारे यांच्या मित्रांपैकी दोघे जखमींजवळ थांबले. प्रकाश कटारे आणि विकी बताडे यांनी मोटरसायकलीने कारचा पाठलाग सुरू केला. कार पंचवटी चौकातून उजव्या बाजूचे वळण घेऊन मध्यवर्ती बसस्टँडच्या दिशेने भरधाव निघाली होती. रस्त्याने जात असताना कारने कार्तिकी सिग्नलवर इनोवा हायक्रॉस कारला MH 20 HB 5016) जोराने धडक दिली. त्यानंतर त्याने उजवे वळण घेऊन सावरकर चौकाचे दिशेने भरधाव निघाला. बजाज डिस्कवर मोटारसायकलीला (MH 20 CP 8639) धडक दिली.
मोटारसायकलवरील शुभम सुरेश चंद्रे (वय २७, रा. जाधववाडी टीव्ही सेंटर) हा जखमी झाला. त्यानंतर उजवे वळण घेऊन बंडू वैद्य चौकात कारने आणखी एका दुचाकीला (MH 20 FA 7056) धडक दिली. नंतर उजवे वळण घेऊन भरधाव जात असताना विजय पांडे यांच्या दवाखान्यासमोर स्कार्पिओ (MH 20 DJ 7243) कारला जोराने धडक देऊन थांबला. त्याच वेळी प्रकाश कटारे आणि विकी यांनी कारचालकाला गाठले. या स्विफ्ट कारचा क्रमांक MH 20 FP 9066असा होता. कार चालकाला स्विफ्ट कारमधून बाहेर काढले असता त्याच्या तोंडाचा दारू पिला असल्यामुळे उग्र वास येत होता. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी हाताने मारहाण केली.
कटारे यांनी लगेचच ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवले. काही वेळात क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी हे विजय पांडे यांच्या दवाखान्यासमोर समर्थनगर येथे आले. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संकेत शंकर अंभोरे (वय २८ रा. भिमनगर भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यानंतर त्यास पोलिसांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांच्या गाडीतून घाटी रुग्णालयात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. अधिक तपास पोलीस पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे करत आहेत. कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला जात असताना शेकडो नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले होते.