- Marathi News
- सिटी क्राईम
- उल्कानगरीतील शुभप्रिया हाईटस सहा मजली इमारत बांधताना मोठी दुर्घटना; पाचव्या मजल्यावरून महिला कोसळून
उल्कानगरीतील शुभप्रिया हाईटस सहा मजली इमारत बांधताना मोठी दुर्घटना; पाचव्या मजल्यावरून महिला कोसळून मृत्यूमुखी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उल्कानगरीत शुभप्रिया हाईटस ही सहा मजली इमारत बांधली जात असून, बांधकाम सुरू असताना पाचव्या मजल्यावरून कोसळून मजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बुधवारी (२३ जुलै) जवाहरनगर पोलिसांनी दोन्ही कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१८ जुलैला गजानन व त्यांची पत्नी अर्चना, मिस्त्री सुनिल दुर्वे असे नेहमीप्रमाणे शुभप्रिया हाईटस इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सकाळी ९ पासून काम करत होते. दुपारी दीडला जेवणाच्या सुट्टीत पात्रे दाम्पत्य इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या त्यांच्या रूममध्ये गेले. जेवण करून अंदाजे अडीचला परत कामावर पाचव्या मजल्यावर गेले. मिस्त्री सुनिल दुर्वे व गजानन फळी व बल्ल्या, पालक बांधत होते. अर्चना त्यांच्या हाताखाली विटा, रेती आदी बांधकामाचे साहित्य देत होती. अर्चना बाजूच्या रूममध्ये पाणी पिण्यासाठी गेली असता तोल जाऊन पाचव्या मजल्यावर खाली पडली. कॉलमचा स्लॅबच्या बाहेरील बाजूस संरक्षित जाळी अथवा लाकडी कठडे लावलेले नव्हती. त्यामुळे अर्चना पडली.
कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल
गजानन यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात बुधवारी (२३ जुलै) तक्रार दिली. तक्रारीनुसार, बांधकामामध्ये इमारतीच्या बाहेरील बाजूस कोणत्याही प्रकारची संरक्षित जाळी अथवा लाकडी कठडे न लावल्याने, हेल्मेट, संरक्षण कीट न दिल्याने अर्चनाचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. याला जबाबदार शुभप्रिया हाईट्स इमारतीच्या बांधकामाचे कॉन्ट्रक्टर संजय मानसिंग संत्रे, ठेकेदार युसूफ पठाण असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी कोणतीही खबरदारी न घेता तसेच सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न करता काम करण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.