छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षावाल्यांकडून होणाऱ्या गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे. कारवाई, तपासणी सातत्याने पोलीस करत असतात. मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षावाल्यांची मुजोरी संपायला तयार नाहीत. पोलीस कारवाई करायला लागताच ते गायब होतात आणि कारवाईचा त्रास गुन्हेगारांऐवजी सामान्य रिक्षावाल्यांनाच जास्त होतो. आता एका रिक्षावाल्याने हद्दच केली. ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्तीचे भाडे मागून प्रवाशाला रॉडने बेदम मारहाण केली. पाय फ्रॅक्टर केला असून, हात-पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) रात्री ८ च्या सुमारास पंचायत समितीसमोर घडली.
आवेज खान गुलामगौस खान (वय ३६, रा. आलमगिर कॉलनी, आलमगिर मशिदीसमोर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते महेमूदभाई ठेकेदार यांच्याकडे सुपरवायजर आहेत. मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास ते कामानिमित वाळूज पंढरपूरला गेले होते. काम आटोपून संध्याकाळी साडेसहाला पंढरपूरहून बसने बाबा पेट्रोलपंप चौकात आले. तिथून कलेक्टर ऑफिसला येण्यासाठी ते रिक्षात बसले. रिक्षावाल्याने रिक्षा सिटी क्लब येथे थांबविली. आवेज यांच्यासोबत त्यांचे मित्र अश्फाक खान साहेब खान हेही होते. रिक्षावाल्याला आवेज म्हणाले, की रिक्षा कलेक्टर ऑफिसला घे. आम्हाला तेथे उतरून दे. त्यावेळी तो म्हणाला, की एखादे सिट येऊ द्या.
त्यावेळी आवेज म्हणाले, की आम्ही येथून दुसऱ्या रिक्षाने जातो, त्यावेळी रिक्षावाला म्हणाला, की ऐसा कैसे जाओगे, मेरेही रिक्षासे चलो थोडा रुको... त्यावेळी रिक्षावाल्याला आवेज म्हणाले, की तुझे पैसे घेऊन टाक. आम्हाला वेळ होतोय. आम्ही दुसऱ्या रिक्षात जातो. त्यावेळी रिक्षावाल्याने ५० रुपये मागितले. आवेज यांनी त्याला ४० रुपये दोघांचे भाडे ठरल्याप्रमाणे दिले. त्यावर ते ४० रुपये रिक्षावाल्याने घेतले नाही व शिवीगाळ करायला लागला. त्यावर आवेज यांनी त्याला सांगितले, की शिव्या देऊ नको, ५० रुपये घे... मात्र रिक्षावाल्याने रिक्षातून रॉड काढला. त्यावेळी तेथे जमा झालेल्या अनोळखी व्यक्तीने आवेज यांना मोटारसायकलीवर पंचायत समितीच्या गेटसमोर सोडले. अश्फाक हा थोड्या वेळाने आला.
पंचायत समितीसमोर बाळू जाधवच्या हॉटेलवर आवेज, अश्फाक आणि आणखी एक मित्र उबेद शहबाज सय्यद असे तिघांनी चहा घेतला. अश्फाक तेथून निघून गेला. त्याचवेळी पैशांवरून वाद घातलेला रिक्षावाला रात्री ८ ला तिथे हातात रॉड घेऊन आला. त्याच्यासोबत आणखी दोन मुले अजून होते. तिघे आल्यानंतर लगेच रिक्षा वाल्याने रॉडने आवेज यांच्या डाव्या पायावर मारून पाय फ्रॅक्चर केला. दोन्ही हातांवर, पाठीवर रॉड मारला. दोघे त्याला मार त्याला मार असे चिथावत होते. दोघांनी लाथांनी, हातांनी आवेज यांना मारहाण केली. रिक्षावाल्याचे नाव शेख फारुख उर्फ पत्रा असल्याचे आवेज यांना कळले. इतर दोघांचे वय अंदाजे २८ ते ३२ असतील, असे आवेज यांनी पोलिसांना सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.