छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्समुळे अनेक लोक फसले आहेत. शिवाजीनगरात राहणाऱ्या तरुणीला आलेला अनुभव तर भयंकर आहे. जीवनसाथी डॉटकॉमवरून तिने जीवनसाथी तर शोधला, पण तो असा निघाला, की आता पश्चाताप करण्यापलिकडे तिच्या हाती काही उरले नाही. पुंडलिकनगर पोलिसांत तरुणीने तक्रार देताना सासरी घडलेल्या कौर्याची माहिती दिलीच, पण सासूचा जो घाणेरडा कारनामा तिने सांगितला तो ऐकून पोलीसही चक्रावले...
हर्षाने (नाव बदलेले आहे) या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती पाच महिन्यांपासून माहेरी राहत आहे. तिने लग्न जुळविण्यासाठी जीवनसाथी डॉट कॉम ॲपवर नोंदणी केली होती. ऑगस्ट सन २०२४ मध्ये तिला कर्नाटकातील बेळगाववरून पहायला एक महिला आणि तिचा मुलगा आला. हर्षाला बघून त्यांनी लगेचच पसंत असल्याचे सांगितले. त्यानंतर हर्षाचे वडील, भाऊ, आई हे बेळगावला मुलाच्या घरी गेले. मुलगा नोएडा दिल्ली येथे आय. टी. क्लाऊड इंजिनियरची नोकरी असल्याने हर्षाच्या आई, वडिलांनी व भावाने लगेचच पसंती दर्शविली. त्यानंतर १५ दिवसांतच बेळगाव येथे मुलाच्या घरी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला.
त्यानंतर २४ नोव्हेंबरला बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये हळदीचा कार्यक्रम झाला. तिथे हर्षाच्या सासूने राहण्याची चांगली व्यवस्था केली नाही म्हणून वाद घातला होता. लग्नाचा संपूर्ण हर्षाच्या कुटुंबीयांनी करण्याचे ठरले. हर्षाच्या अंगावर पाच तोळे सोन्याचे दागिने घालण्याचेही ठरले. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी हर्षाचे लग्न बीड बायपासच्या हॉटेलवर लागले. लग्नानंतर हर्षा सासरी बेळगाव येथे नांदण्यास गेली असता एक ते दीड महिनेच पती तिच्यासोबत राहिला. नंतर पतीने व सासूने तिला सांगितले की, त्याची नोकरी आतापर्यंत वर्क फॉर्म होम होती. मात्र आता त्याला नोकरीसाठी बेंगलोर येथेच राहावे लागत आहे. मात्र त्याने हर्षाला सोबत नेण्यास टाळाटाळ केली. तिने सोबत नेण्यासाठी तगादा लावला असता पती व सासूने तू तुझ्या माहेराहून घर घेण्यासाठी ५० लाख रुपये आण, अशी मागणी केली.
हर्षाचे आई, वडील इतके श्रीमंत नसल्याने तिने असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर पती, सासूने शिवीगाळ करून तिला मारहाण केली. पैसे आणू शकली नाही म्हणून सासूने तिच्यावर घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली. तुझे बाहेर अनैतिक संबंध आहे, असे म्हणून घरात एक महिला आणून तिचे व्हिडीओ व फोटो काढण्यास सांगितले. तिने विरोध केल्याने सासूने मारहाण करून हर्षाचे अंगावरील कपडे काढून तिला अगरबत्तीचे चटके देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती बचाव करत असताना सासूने तिची पँट काढली. त्यामुळे ती घाबरून आरडाओरड करू लागली. शेजारी धावून आले. त्यांनी हर्षाला त्यांच्या तावडीतून सोडवले व कपडे दिले. त्यानंतर बेळगाव महिला पोलीस ठाण्यात जाऊन हर्षाने २७ जानेवारीला तक्रार दिली होती. त्यानंतर ती माहेरी आली. तशी माहेरी राहत आहे. हर्षाचे आई, वडील व भाऊ हे सासू व पतीला समजाविण्यासाठी बेळगाव येथे गेले असता त्यांनी सर्वांना घराबाहेर हाकलून दिले. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे करत आहेत.