- Marathi News
- सिटी क्राईम
- रोडरोमिओंची मस्ती उतरवली!; एमजीएम कॅम्पस्मध्ये स्पोर्ट्स बाईकवरून यायचे अन् मुलींना त्रास द्यायच...
रोडरोमिओंची मस्ती उतरवली!; एमजीएम कॅम्पस्मध्ये स्पोर्ट्स बाईकवरून यायचे अन् मुलींना त्रास द्यायचे, आता पोलिसांनी अशी अद्दल घडवली, की जेलमधून बाहेर पडायला कित्येक वर्षे लागतील...

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एमजीएम कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दोन रोडरोमिओंची मस्ती पोलिसांनी पुरती जिरवली आहे. शेख समीर शेख सलीम (वय २५, रा. इंदिरानगर) आणि सय्यद ईजाज सय्यद मुख्तार (वय २५) नावाचे हे टवाळखोर विना क्रमांकाच्या पांढऱ्या स्पोर्ट्स बाईकवरून मुलींसमोरून सुसाट जात, वेडी-वाकडी बाईक चालवून मुलींना घाबरवत होते. काही मुलींचा पाठलाग करत होते. अश्लील हावभाव करत होते. मुलींचे गुप्तपणे व्हिडीओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल करत होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन अटक केली. त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची महागडी बीएमडब्ल्यू बाईकही जप्त केली आहे. बाकी पोलीस ठाण्यात केलेला यथेच्छ पाहुणाचार हा वेगळाच... आता या दोघांची कॉलेज परिसरातून धिंड काढावी, अशी मागणी होत आहे. न्यायालयाने या दोघांचा एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सिडको पोलीस ठाण्यात बुधवारी (१० सप्टेंबर) पोलीस अंमलदार कल्पना खरात यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ५ सप्टेंबरला दुपारी चारला दामिनी पथकातील पोलीस अंमलदार कल्पना खरात, सुनीता नागलोद, अंबिका दारूंटे, सरिता कुंडारे, कविता गवळी या एमजीएम कॉलेज परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी काही कॉलेज विद्यार्थिनींनी त्यांना भेटून दोन रोडरोमिओंची दुष्कृत्याची माहिती दिली. दोघे टवाळखोर स्पोर्ट्स बाईकवरून सुसाट येत कर्कश आवाज करायचे. फटाक्यासारखा हॉर्न वाजवायचे आणि पुढे मुलींना वेठीस धरायचे.
शेख समीर बाईक चालवायचा तर सय्यद ईजाज व्हिडीओ बनवायचा. पोलिसांनी अटक करून पाहुणचार केला तेव्हा त्याने हात जोडून माफी मागितली आणि पुन्हा असे प्रकार करणार नाही, असे म्हणत दया मागू लागला. समीरचे सोशल मीडियावर १ लाख ४० हजार फॉलोअर्स आहेत. त्याच्या वडिलाचे नारेगावमध्ये भंगारचे गोडाऊन आहे. समीर दहावी नापास आहे, हे विशेष. उच्चभ्रू राहणीमान असल्याचे दाखवून मित्राकडून सेकंड हँड गाड्या तात्पुरत्या घेऊन टवाळखोरी करायचा.
दोघांनी लव्ह जिहादद्वारे कुणा मुलींना फसवले का, याचाही तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळून कडक कारवाई केल्याने अशाप्रकारे कॉलेजेस-शाळा परिसरात रोमिओगिरी करणाऱ्या, मुलींच्या छेड काढणाऱ्या टवाळखोरांना थरकाप सुटणार एवढे नक्की. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून, सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करत आहेत.
दुचाकींचा कर्कश आवाज करून महाविद्यालयांच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर यापुढे अशीच कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
-पोलीस आयुक्त प्रवीण पवार