- Marathi News
- सिटी क्राईम
- मिनी घाटीतील अनागोंदी उठली रुग्णांच्या जिवावर, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याच...
मिनी घाटीतील अनागोंदी उठली रुग्णांच्या जिवावर, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, नातेवाइकांचा आक्रोश, आदळआपट

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील मिनी घाटी रुग्णालयातील अनागोंदी, हलगर्जीपणा यापूर्वीही चर्चेत आला आहे आणि रुग्णांच्या जिवावर बेतल्याचे आरोप झाले आहेत. आता आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत. नातेवाइकांनी आक्रोश करत आदळआपट सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी (२३ जुलै) रात्री साडेआठला हा प्रकार घडला.
मिनी घाटी रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा रुग्ण दगावले असून, त्याही वेळी नातेवाइकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत. दरम्यान, या घटनेबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी सांगितले, की घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यानंतरच नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट होईल.
दोन व्हिडीओंमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेची पोलखोल
घाटी आणि मिनी घाटीतील दोन व्हिडीओंमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. एका व्हिडीओत मिनी घाटीत ओपीडीमध्ये एक डॉक्टर टेबलवर डोके ठेवून झोपलेले आहेत. त्यांच्या बाजूला अन्य कर्मचारी आहेत. रुग्णांची गर्दी आहे. डॉक्टरांच्या झोपेमुळे महिलेला सोनोग्राफीसाठी तासभर ताटकळावे लागले. दुसऱ्या व्हिडीओत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी एक महिला आली असून, तिची तक्रार आहे, की रुग्णाला अटॅक आला असून, तिला मिनी घाटीतून घाटीत पाठवले. घाटीत केसपेपर काढण्यासाठी नंबर लावला. पण वेळ संपला म्हणून परत पाठवण्यात आले. या घटनेवर घाटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचेता जोशी यांनी दावा केला आहे, की ४८ वर्षीय रुग्ण घाटीतील अपघात विभागाला आला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून आयसीयूत पाठविण्यात आले. मात्र रुग्ण घरी निघून गेला.