बलात्‍कार पीडितेला वकिलाने पाठवले अश्लील व्हिडीओ!; मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बलात्‍कार पीडितेने गुन्हा मागे घ्यावा म्‍हणून वकिलाने चक्क तिला तिचे एडिट केलेले अश्लील व्हिडिओ पाठवले. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली मुकुंदवाडी पोलिसांनी या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (१३ सप्‍टेंबर) रात्री हा प्रकार घडल्याचे २७ वर्षीय पीडित तरुणीने म्‍हटले आहे.

ॲड. महेंद्र भगवान नैनाव (रा. एन ६, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. सध्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी व मूळची पाचोरा (जि. जळगाव) येथील असलेल्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे, की ॲड. नैनावने तिला धमक्या दिल्या, की तुला दुसरा भेटला आहे. तू केस मागे घेणार होतीस. पण तू पोलिसांकडे तक्रार केली म्हणून आता मी तुझी सुपारी देतो. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांचे काही मॉर्फ केलेले आणि एडिट केलेले व्हिडीओ तिला पाठवले. हे व्हिडीओ पाहून ती घाबरली. मदतीसाठी तिने तातडीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला.

पण ते व्हिडीओ पाहत असतानाच नैनावने डिलिट केले. नंतर धमकीचे मेसेज पाठवले. माझ्याकडे तुझे फोटो आहेत. मी ते व्हायरल करील. समाजात तुझी बदनामी करील... या मेसेजचे स्क्रीनशॉट तरुणीने जपून ठेवले आणि नैनावविरुद्ध तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले. मात्र ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी असहकार्य केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पोलीस दखल घेत नसल्याने तिने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे धाव घेतली. पालकमंत्र्यांनी तिची भेट घेऊन पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्‍यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण...
तक्रारदार तरुणी पतीपासून विभक्‍त राहते. ॲड. नैनाव याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिला दोनदा प्रेग्‍नंट केले अन्‌ गर्भपात करवला. गेल्या ३ ऑगस्टपासून लग्‍नाला नकार देत संपर्कच बंद केल्याने तिने सिडको पोलीस ठाण्यात त्‍याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने पोलिसांनी ॲड. नैनावविरुद्ध ऑगस्टमध्ये गुन्हा दाखल केला होता. या तरुणीला सहा वर्षांचा मुलगा आहे. पतीसोबत तिची कौटुंबिक न्यायालयात केस सुरू आहे. महेंद्र तिचा स्‍कूलमेट असून, ८ मार्च २०२५ रोजी पाचोरा येथील न्यायालयात दोघांची कामादरम्यान भेट झाली होती. शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा मैत्री बहरली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. महेंद्र तिला टीव्ही सेंटरसह शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवू लागला. यातून ती प्रेग्नंट राहिली.

त्‍याने प्रेमाची शपथ देऊन गर्भपात करवला. नंतर तुझे एलएलबीचे शिक्षण करतो. तू माझ्यासोबत राहा. आपण रूम करून राहू, असे म्हणून तिला तो १२ जूनला शहरात घेऊन आला होता. त्यानंतर दोघे जयभवानीनगरमध्ये एकत्र राहू लागले होते. यातून ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली. महेंद्रने तिचा पुन्हा गर्भपात करवला. तरुणीने लग्नाचा विषय काढला की तो बँकेत सेव्हिंग करून सेटल होऊ दे. नंतर लग्न करू, असे म्हणून टाळाटाळ करायचा. ती आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिला मारहाण करत होता. तरुणीने लग्नाचा हट्ट सुरूच ठेवल्याने दोघांत वाद सुरू झाले. मी हायकोर्टात वकील आहे. सगळे मॅनेज करू शकतो, असे तो तिला धमकावत होता. तिच्या सोशल मिडिया खात्यांचे पासवर्ड स्वतःकडे ठेवून त्यावर लक्ष ठेवायचा. ३ ऑगस्टला तो तिला गाडीने उडवण्याची धमकी देऊन निघून गेला आणि त्‍याने तिच्याशी संपर्क बंद केला आहे. तिचे कॉल घेणेही त्याने बंद केले. त्यानंतर तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

यापूर्वी कारने अपघात घडवला होता...
यापूर्वी या तरुणीचा अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्‍न झाल्याची तक्रार वेदांतनगर पोलीस ठाण्यात २५ ऑगस्टला करण्यात आली आहे. महेंद्रपासून जिवाला धोका असल्याची तक्रार तिने पोलीस आयुक्‍तांकडे केल्याने तिला पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. सेशन कोर्टात तारिख असल्याने पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस अंमलदार पद्‌मा रामराव शहाणे यांच्यासह ती १३ ऑगस्टला स्कुटीवरून सेशन कोर्टाजवळ दुपारी एकच्या सुमारास आली असता कोर्टाजवळच एक नेक्सा कारने (MH 20 GK 8983) भरधाव पुढे येऊन अचानक ब्रेक मारले. कारमागे स्कुटी असल्याने दोघीही गाडीवरून पडल्या व मार लागला. नेक्सा कारचालकाने काय करायचे ते करा, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर पीडित तरुणी आणि पोलीस अंमलदार शहाणे या सेशन कोर्टात तारखेसाठी कोर्टात गेल्या असता ॲड. संतोष सरताळे यांनीही तरुणीला धमकी दिली. आज तुमचा अपघात केला. तुझी केस मागे घे, अन्यथा तुला जीवे मारू, अशी धमकी दिली होती. त्यावरून नेक्सा कारचालक व ॲड. सरताळेविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या बलात्‍कार प्रकरणात इतक्या घडत असल्याने शहरात वारंवार चर्चा होत आहे. सिडको, वेदांतनगर आणि आता मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी या प्रकरणात व्यस्त होणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software