- Marathi News
- सिटी क्राईम
- मस्तवालपणाचा कहर : ट्युशनमध्ये मुलींच्या भांडणावरून पोलीस निरीक्षकाच्या भावाने कुटुंबाचे घर गाठून ला...
मस्तवालपणाचा कहर : ट्युशनमध्ये मुलींच्या भांडणावरून पोलीस निरीक्षकाच्या भावाने कुटुंबाचे घर गाठून लाठ्याकाठ्यांनी चढवला हल्ला, मुलीच्या आईला पायावर नाक घासायला लावले!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा भागातील सर्वेश्वरनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मंगळवारी (२२ जुलै) सकाळी ९ च्या सुमारास पोलीस निरीक्षकाच्या भावाने एका कुटुंबावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. दाम्पत्याला बेदम मारहाण केली. तुझ्या मुलीमुळे माझ्या मुलीची इज्जत गेली, असे म्हणत महिलेचे केस पकडून पायावर नाक घासून माफी मागायला लावली. भावाच्या नावाने धमक्या देत होता, अश्लील शिवीगाळ करत होता. दोन मुलींचे ट्युशन क्लासमध्ये भांडण झाल्यानंतर शिक्षकांनी आपल्या मुलीला माफी मागायला लावल्याचा हा सर्व राग होता...
साताऱ्यातील सर्वेश्वरनगरमधील रहिवासी ४५ वर्षीय व्यक्तीचा नागेश्वरवाडीत गेम झोनचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी सानिका व लंकेची मुलगी एकाच ट्यूशन क्लासमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी सानिका आणि लंकेच्या मुलीचे भांडण झाले. शिक्षकांनी दोघींचा वाद मिटवला आणि मुली पुन्हा चुकीच्या वाटेवर जाऊ नयेत म्हणून लंकेच्या मुलीला सानिकाची सर्वांसमोर माफी मागायला लावली. यामुळे लंकेच्या मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली. तिने घरी आल्यावर पालकांना सांगितले. त्यामुळे लंकेचा राग अनावर झाला. सोमवारी (२१ जुलै) त्याने सानिकाच्या वडिलांचे दुकान गाठून शिवीगाळ केली होती. त्या वेळी माझा भाऊ पोलीस आहे, असे त्याने धमकावले होते. मंगळवारी (२२ जुलै) त्याची खुमखुमी पुन्हा उफाळून आली. सकाळी ९ लाच त्याने पत्नी आणि दोन साथीदारांसह सानिकाचे घर गाठले.
सानिकाच्या आई-वडिलांना लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. सानिकाच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर केस धरून लंकेच्या पत्नीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. सानिकाच्या वडिलांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार केले. दाम्पत्याचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत दाम्पत्याची सुटका केली. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांनीही तिथे धाव घेतली.
पायावर नाक घासताच पाठीत जोराचा वार...
सानिकाच्या आईने घटनेबद्दल पोलिसांना सांगितले, की लंके सलग शिवीगाळ करत होता. तुझ्या मुलीमुळे माझ्या मुलीची इज्जत गेली. आता मी तुझ्या मुलीला सोडणार नाही. तू आता आमच्यासमोर नाक घास, असे म्हणून माझे केस ओढून तोंड फरशीवर व त्याच्या पत्नीच्या पायांवर त्याने जोराने रगडले. नंतर पाठीत जोराचा वार केला. माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यानंतर माझी शुद्ध हरपली, असे त्यांनी सांगितले. सानिकाची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. हल्लेखोर घुरात घुसले त्यावेळी त्या वरच्या खोलीत घरकाम करत होत्या. खालच्या रूममधून आरडाओरड ऐकू आल्याने त्या खाली धावल्या. पतीला वाचवण्यासाठी विनवणी करू लागल्या. त्यानंतर त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला चढवला.
मुलगी डोळ्यांसमोर दिसलाच घट्ट मिठी मारली...
हल्लेखोरांच्या मारहाणीत सानिकाच्या आईची शुद्ध हरपली होती. जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्या शेजारच्यांच्या घरात होत्या. त्यांनी आधी मुलगी कुठे आहे, पती कुठे आहेत, अशी विचारणा केली. पोलिसांनी सानिकाला आणल्यानंतर त्यांनी सानिकाला घट्ट मिठी मारली. माझ्या मुलीला ते लोक मारून टाकतील, अशी भीती त्या व्यक्त करत होत्या. सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील अधिक तपास करत आहेत.