- Marathi News
- सिटी क्राईम
- ३ दिवस वारकऱ्यांच्या वेशात ठेवली पाळत, चौथ्या दिवशी पोलिसांना पावला ‘विठ्ठल’; घरफोड्या वामन दिसताच घ...
३ दिवस वारकऱ्यांच्या वेशात ठेवली पाळत, चौथ्या दिवशी पोलिसांना पावला ‘विठ्ठल’; घरफोड्या वामन दिसताच घेरून घातली झडप!, छ. संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी सांगितला सराईत गुन्हेगाराला पकडण्याची थरारप्रसंग !!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एसी बसने पुण्याहून छत्रपती संभाजीनगर शहरात येत रेकी करून घरे फोडणारा सराईत गुन्हेगार पोलिसांनी अखेर पकडलाच. पण त्यासाठी त्यांना दीर्घ मेहनत आणि संयमाच्या कसोटीवर उतरावे लागले. सलग ३ दिवस वारकरी वेशात गुन्हेगाराच्या गावात पाळत ठेवल्यानंतर चौथ्या दिवशी पोलिसांना विठ्ठल पावला अन् सराईत गुन्हेगार वामन नंदु राठोड (वय ३२, रा. फंड वस्ती, गणपती रांजनगाव ता.शिरूर, जि. पुणे) दिसला. लगेचच सर्व पोलिसांनी घेरून त्याच्यावर झडप घातली. शनिवारी (२६ जुलै) पहाटे तीनला केलेली ही चित्तथरारक कारवाई छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी सांगितली...
पूजा अजिंक्य पाटील (वय ३९, रा. शेंद्रा) यांनी आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार चिकलठाणा पोलीस ठाण्यात ३० मार्चला केली होती. त्या माहेरी गेलेल्या असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याची व डायमंडची अंगठी, रोख रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेला केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसोशीने तपास करत असताना त्यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे हा गुन्हा वामन नंदू राठोड (रा. फंड वस्ती, गणपती रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) याने केल्याची माहिती मिळाली.
वामन सराईत गुन्हेगार असल्याने तो सातत्याने त्याची राहण्याची ठिकाणे बदलत होता. तो त्याच्या गावी फंड वस्ती येथे येणार असल्याची खात्रीशिर माहिती पथकाला मिळाली. यावरून पथकाने फंड वस्ती येथे वेशांतर करून सापळा रचला. तीन दिवस पथक त्या परिसरात वारकऱ्यांच्या वेशात तळ ठोकून होते. वामनची गावातच ४ घरे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने तो कोणत्याही घरी येऊ शकत असल्याने पथकाने सचोटीने पाळत ठेवली. शनिवारी (२६ जुलै) पहाटे तीनला वामन गावातील रस्त्याने घाईघाईने घराकडे जाताना पथकाला दिसला. हालचालीवरून पथकाचा संशय बळावल्याने तो बेसावध असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
चौकशीत वामन पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वामनने चिकलठाणा हद्दीतील, शेंद्रा, देवळाई परिसर, घारदोन तर पाचोड हद्दीतील अंतवाली खांडी येथील ४ घरे फोडल्याचे कबूल केले आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास चिकलठाणा पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे, पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, कासिम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, योगेश तरमळे, जीवन घोलप, शिवाजी मगर यांनी केली आहे.
पुण्यातून एसी बसने यायचा, महागड्या लॉजमध्ये थांबायचा...
वामन हा पुण्याहून एसी बसने छत्रपती संभाजनगर शहरात यायचा. महागड्या लॉजमध्ये थांबून सेल्समनसारखी बॅग पाठीवर अडकून शहर परिसरात रेकी करत होता. बंद घर दिसले की २० मिनिटांत कडी-कोयंडा तोडून चोरी करत होता. नंतर तो लॉजवरून तत्काळ बॅग घेऊन पुण्याला निघून जात होता.