- Marathi News
- सिटी क्राईम
- १५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच को...
१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १५ दिवसांत चक्रावून टाकणारा नफा हातात पडत होता... त्यामुळे एकाचे पाहून दुसऱ्याने, मग तिसऱ्याने अन् मग अनेकांनी लाखो रुपये एका भामट्याकडे गुंतवले... आता थोडीथोडका नाही तर, तब्बल अडीच कोटींना गंडा घालून भामटा फरारी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या व्यावसायिकाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, काहींनी तर कर्ज काढून जास्त नफ्याच्या आमिषाने गुंतवणूक केली होती. काहींनी चक्क शेतं विकली आहेत. फर्दापूर पोलिसांनी भामट्याविरुद्ध बुधवारी (३ सप्टेंबर) गुन्हा दाखल केला आहे.
जून-जुलै २०२३ मध्ये विशालने पाटील यांना सांगितले, की मला कमी किमतीत छान गाडी मिळत आहे. परंतु मला ती गाडी घेण्यासाठी काही पैसे कमी पडत आहेत. त्यावेळी मदत म्हणून पाटील यांनी त्याला ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्याने त्या पैशातून ह्युंदाईची ॲसेंट गाडी घेतली. त्यावर काम करून त्याने पैसे थोडे थोडे करून परत केले. त्यामुळे पाटील यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने कमीच कालावधीत टोयोटाची इनोवा गाडी घेतली. त्यावेळी पाटील यांना त्याचे नवल वाटले की इतक्या कमी वेळात याने अजून दुसरे वाहन कसे घेतले? त्यावर त्याने सांगितले, की मी डेंटलचे एक्सरे पॅकेट यांचे होलसेलींग करतो. बऱ्याच कॉलेजेस व हॉस्पिटलमध्ये माझा माल पुरवत असतो. तसेच मी त्यासंबंधी लागणारे इक्वीपमेंट जसे की एक्सरे मशिन वगैरे ते देखील मी पुरवत असतो. त्यातूनच मला एवढा नफा मिळत असल्याने मी तुमचे पैसे परत करून इनोवा गाडी घेऊ शकलो. त्याला झालेला नफा त्याने सांगून पाटील यांनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामुळे पाटील यांनी त्याला ऑगस्ट २०२३ मध्ये २७ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर त्याने पुढील अवघ्या पंधरा दिवसांतच ३३ हजार रुपये दिले. त्यातून ६ हजार रुपयांचा फायदा झाला. त्यावेळी त्याने यात आणखी मोठी रक्कम देण्यास सांगितले. जेणेकरून जास्त नफा मिळेल. त्यामुळे पाटील यांनी त्याला ५० हजार रुपये दिले. त्याने परत पुढील पंधरा दिवसांतच ६० हजार रुपये दिले. त्यामुळे पाटील यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसल्याणे ते त्याला मागेल तशी रक्कम देत गेले. तोदेखील कालांतराने नफ्यासह परतावा करू लागला.
पाटील यांनी नातेवाइकांनाही याबाबत सांगून विशालकडे पैसे गुंतवायला सांगितले. डिसेंबर २०२३ मध्ये पाटील यांच्या आजोबांचे वर्ष श्राद्ध असल्याने विशालही मोलखेडा येथे आला होता. गावातील पाटील यांचे नातेवाइक व इतर लोक विशालला भेटले असता त्यांनीही पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्याने तेथेच मोलखेडा गावातील लोकांकडून पैसे घेतले व त्यांनादेखील कालांतराने नफ्यासह रक्कम देत गेला. त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांचे नातेवाइक व गावातील लोकांचाही त्याच्यावर विश्वास वाढला. गावातील लोक विशाल चौधरी याला स्वतःची शेती विकून, शेतमाल विकून तर काहींनी कर्ज काढून जास्त नफा मिळावा म्हणून विशालकडे पैसे दिले.
मग संपर्क केला बंद...
जुलै २०२४ पर्यंत त्याने लोकांना लाखो रुपये दिले. त्यानंतर मात्र अकाऊंटला खूप मोठ्या रकमेचे व्यवहार होत असल्याने शासनाच्या जीएसटी विभागामार्फत नोटीस येऊन अकाऊंट फ्रिज केल्याचे सांगून पैसे देण्याचे तो टाळू लागला. अकांऊट पुन्हा सुरळीत चालू ठेवण्यासाठी शासनाला २० लाख रुपये भरायचे आहेत, असे सांगून त्याने सर्वांकडून २० लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतरही बरेच दिवस तो रकमेचा नफा व मुद्दल देण्यास विलंब करू लागला. त्यामुळे सर्वांनी त्याला भेटून व मोबाइलवर संपर्क करून विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र तो काही ना काही बहाणा करून रक्कम देण्यास टाळटाळ करू लागला व उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नंतर त्याने भेटणेच बंद केले. त्यामुळे पाटील यांच्यासह इतर सर्वांची खात्री पटली की विशाल चौधरी याने कमी दिवसांत जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून जास्तीत जास्त रक्कम लबाडीच्या इराद्याने वसूल केली व फसवणूक केली आहे. जुलै २०२३ ते २९ ऑगस्ट २०२४ या काळात विशालने पाटील यांच्याकडून ६० लाख रुपये व गावातील पाटील यांचे नातेवाइक व इतरांचे १ कोटी ८२ लाख ४५ हजार रुपये असे एकूण २ कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये हडपले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे करत आहेत.