- Marathi News
- जिल्हा न्यूज
- सोयगावच्या वेताळवाडी किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, तोफ अंगावर पडून १ तरुण जखमी, तोफेचेही मोठे नुकस...
सोयगावच्या वेताळवाडी किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, तोफ अंगावर पडून १ तरुण जखमी, तोफेचेही मोठे नुकसान

सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगावजवळील वेताळवाडी किल्ल्यावर तरुणांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे पंचधातूची तोफ कोसळून एका पर्यटकाच्या अंगावर पडली. यात हा पर्यटक जखमी झाला आहे. तोफेचेही नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (४ सप्टेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली. सोयगाव पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी (५ सप्टेंबर ) हुल्लडबाजारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


वेताळवाडी हा सोयगाव तालुक्यातील एक नयनरम्य आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला डोंगरी किल्ला आहे. तो अजिंठा डोंगररांगेत आहे. या किल्ल्याची निर्मिती चालुक्य किंवा यादवकालीन काळात झाली असावी; काही मतानुसार सहाव्या शतकात राजा विक्रमादित्यने बांधल्याचेही म्हटले जाते, परंतु पुराव्यांअभावी निश्चित तारखांकित माहिती उपलब्ध नाही. समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट उंचीवर हा किल्ला उभा आहे. किल्ल्यावर भव्य तटबंदी, बुरुज, धान्याच्या ठेवींनी सजलेली खोल्या (अंबरखाना), हमाम (स्नानगृह), जलमहाल, हवामहाल, तोफा आणि चोर दरवाजा आहे. पावसाळ्यात या परिसरातील हिरवेगार वातावरण आणि धबधबे किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र पुरातत्व विभागाचे या किल्ल्याकडे फारस लक्ष नसते. त्यामुळे अनेक पर्यटक वारंवार किल्ल्याचे नुकसान करून जात असतात. कसे जाल? : छत्रपती संभाजीनगर→ सिल्लोड (६५ किमी) → गोळेगाव (१५–१६ किमी पुढे) → उंडणगाव (५ किमी) → हळदा घाट (सुमारे ३–४ किमी पुढे) → किल्ला किंवा सोयगावपासून थेट घाट रस्त्यावरून किल्ल्याजवळ पोहोचणे शक्य आहे.