पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सहकार्याने) : पतीला मेडिकलचे दुकान टाकण्यासाठी व नणंदेला शिक्षिकेची नोकरी लावण्यासाठी माहेरहून ११ लाख रुपये व एक मोटारसायकल घेऊन ये, अशी मागणी करून २६ वर्षीय विवाहितेचा अनन्वीत छळ सासरच्यांनी केला. त्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) सकाळी समोर आली. पैठण पोलिसांनी तिच्या सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फातिमा खान सिद्दीक पठाण (वय २६, रा. नवगाव ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती सिद्दीक इलियास पठाण, सासू रजियाबी इलियास पठाण, सासरा इलियास अहेमद खान पठाण, दीर इद्रीस इलियास पठाण, जाऊ रुखैयाबी इद्रीस पठाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फातिमाचा भाऊ शाकेर अब्दुल कदिर खान पठाण (वय ३१, रा. पिंपळगाव ता. माजलगाव जि. बीड ह. मु. युसुफ कॉलनी जालना) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते खासगी नोकरी करतात. आई-वडील, पत्नी व भावंडासह राहतात.
फातिमा खान हिचे लग्न २०१७ मध्ये सिद्दीक पठाण (रा. नवगाव ता. पैठण) याच्यासोबत झाले होते. फातिमाला एक ८ वर्षांचा मुलगा व ३ वर्षांची मुलगी आहे. फातिमाचे लग्न झाल्यापासून सासरचे लोक पती सिद्दीक इलियास पठाण, सासू रजियाबी इलियास पठाण, सासरा इलियास अहेमद खान पठाण, दीर इद्रीस इलियास पठाण, जाऊ रुखैयाबी इद्रीस पठाण हे फातिमाला तिच्या नवऱ्याला मेडिकलचे दुकान टाकण्यासाठी व बहिणीला शिक्षकाची नोकरी लावण्यासाठी तुझ्या माहेरहून ११ लाख रुपये व एक मोटारसायकल घेऊन ये, असे म्हणून सतत मानसिक त्रास देऊन मारहाण करत होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत होते.
फातिमा माहेरी आल्यानंतर भाऊ, आई, वडिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल नेहमी सांगत होती. एप्रिल २०२३ मध्ये फातिमाला सासरच्या लोकांनी मारहाण करून माहेरी जालना येथे आणून सोडले होते. फातिमा सहा महिने माहेरी राहिल्यानंतर सासरच्या लोकांना समजावून सांगून तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी तिला सासरी नवगाव येथे नांदण्यासाठी सोडले होते. त्यानंतर सासरचे लोक फातिमाला वेळेवर जेवायला देत नव्हते. तिला व तिच्या मुलांना आजारी पडल्यानंतर उपचारासाठी पैसे देत नसत.
शुक्रवारी सकाळी साडेनऊला नवगाव येथील आमेर पठाण यांनी फातेमाच्या वडिलांना कॉल करून सांगितले, की फातीमाने राहत्या घरी गळफास घेतला आहे. त्यानंतर तिचे आई- वडील, भाऊ, इतर नातेवाइक नवगाव येथे आले. फातिमाच्या आत्महत्येस तिच्या सासरचे लोक पती सिद्दीक इलियास पठाण, सासू रजियाबी इलियास पठाण, सासरा इलियास अहेमद खान पठाण, दीर इद्रीस इलियास पठाण, जाऊ रुखैयाबी इद्रीस पठाण हेच जबाबदार असल्याची तक्रार तिच्या भावाने पोलिसांत केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे करत आहेत.