छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शासकीय नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दोघांना ३ भामट्यांनी ३१ लाखांचा गंडा घातला. बुधवारी (२७ ऑगस्ट) वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. प्रभावती सखाराम वाघ (रा. नारेगाव), पांडुरंग साबळे (रा. मुकुंदवाडी) संतोषकुमार शर्मा अशी भामट्यांची नावे आहेत.
मुंजाजी प्रभाकर वरकड (वय ३३, रा. जयभवानीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. मुंजाजी वरकड आणि त्यांचे चुलत भाऊ इंद्रजित राजेभाऊ वरकड यांची फसवणूक झाली आहे. त्यांचे आतेमामा दत्ता भाऊराव ताटे यांचा वाळूज येथे दत्ता रोडलाइन्स नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तिथे इंद्रजित यांचे वडील राजेभाऊ वरकड यांची संशयित प्रभावती वाघ व पांडुरंग साबळे यांच्याशी भेट झाली होती. राजेभाऊ यांनी मुलगा इंद्रजित सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
त्यावर संशयितांनी पुण्याच्या भारती विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी ३० लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इंद्रजित यांनी २८ लाख रुपये भामट्यांना दिले. यानंतर इंद्रजितला सहायक प्राध्यापक पदाची खोटी नियुक्ती ऑर्डरही देण्यात आली. इंद्रजितला नोकरी लागल्याचे समजून मुंजाजी वरकड यांनीही भामट्यांची भेट घेतली तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनिअर असिस्टंटची नोकरी देण्याचे आमिष त्यांना भामट्यांनी दाखवले. त्यासाठी ३० लाख रुपये मागितले. मुंजाजी यांनी लगेचच ३ लाख रुपये पाठवले.
मार्च २०२४ मध्ये भामट्यांनी मुंजाजी यांना मुंबई मंत्रालयात बोलावून संतोष कुमार शर्मा याच्याशी ओळख करून दिली. संतोषने मुंजाजी यांना सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदाची खोटी ऑर्डर दाखवली. उर्वरित २७ लाख रुपये दिल्यावर नोकरीवर रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले. संशय आल्याने मुंजाजी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी केली असता ती ऑर्डर खोटी असल्याचे समोर आल्याने त्यांना धक्काच बसला.
चुलत भाऊ इंद्रजित वरकडलाही खोटी ऑर्डर दिली होती. त्यामुळे वरकड बंधूंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी प्रभावतीकडे पैशांचा तगादा लावला असता तिने माझ्या आईची शेती तुमच्या नावावर करते, असे सांगितले. इसार पावतीही करून दिली. मात्र तिथेही भामटेगिरी समोर आली. प्रभावतीने ही जमीन दुसऱ्याला विक्री केल्याचे समोर आल्याने वरकड बंधूंना दुसरा धक्का बसला. मुंजाजी वरकड यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.