- Marathi News
- सिटी क्राईम
- बी. कॉम.च्या ४ तरुणींत फ्री स्टाइल, एकमेकींवर कटरचे वार, चौघीही जखमी!, उस्मानपुऱ्यातील धक्कादायक घट...
बी. कॉम.च्या ४ तरुणींत फ्री स्टाइल, एकमेकींवर कटरचे वार, चौघीही जखमी!, उस्मानपुऱ्यातील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नामांकीत महाविद्यालयात उच्चशिक्षण घेणाऱ्या ४ तरुणींत मंगळवारी (२२ जुलै) रात्री आठला तुंबळ हाणामारी झाली. धारदार कटरने एकमेकींवर वार केले. यात चौघीही जखमी झाल्या आहेत. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांनी चौघींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हा राडा उस्मानपुऱ्यात घडला.
मंगळवारी रात्री आठला वर्षा, रोहिणी आणि स्वरा यांनी उस्मानपुऱ्यातील सायलीच्या घरी धडक दिली. शिवीगाळ केल्यावरून तिघींनी जाब विचारला असता वाद वाढून अचानक चौघींत हाणामारी सुरू झाली. सायलीने तिघींवर कटरने वार केले. तिच्या आईनेदेखील मारहाण केली. यात तिघीही जखमी झाल्या, असे वर्षाने म्हटले आहे. सायलीच्या आरोपानुसार स्वरानेही तिच्यावर कटरने वार केले. यात ती जखमी झाली. तरुणींमध्ये सुरू असलेल्या हाणामारीची माहिती मिळताच उस्मानपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चौघींना रुग्णालयात दाखल केले.
वर्षाच्या आरोपानुसार, ८ जुलैला स्वराच्या वाढदिवशी स्वरा आणि सायलीत वाद झाला, तेव्हापासून आम्ही तिघी (वर्षा, रोहिणी आणि स्वरा) सायलीसोबत बोलत नव्हतो. सायलीने २१ जुलैला मध्यरात्री १ वाजता मला कॉल करून तुम्ही तिघी माझ्यासोबत का बोलत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर २२ जुलैला दुपारी २ वाजता पुन्हा कॉल करून शिवीगाळ केली. ही बाब मी रोहिणी आणि स्वराला सांगितल्यानंतर तिघींनी सायलीच्या घरी जाऊन जाब विचारण्याचे ठरले. रात्री आठला आम्ही सायलीच्या घरी आलो. तिला घराखालूनच आवाज दिला असता तिची आई खाली आली आणि शिवीगाळ करू लागली. त्यामुळे वाद वाढून हाणामारी होऊन सायलीने आमच्यावर कटरने वार केले.
सायलीने तक्रारीत म्हटले आहे, की मी बीबीएच्या तिसऱ्या वर्षात शिकते. २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामादरम्यान पुण्यात माझी स्वरासोबत ओळख झाली होती. सहा महिन्यांपूर्वी मी छत्रपती संभाजीनगर शहरात आल्यानंतर स्वरादेखील माझ्याच घरी येऊन राहत होती. एप्रिलचा शेवटचा आठवडा ते ८ जुलैपर्यंत ती माझ्या घरी राहिली. याचदरम्यान वर्षा आणि रोहिणीसोबत माझी ओळख झाली. स्वरा ही माझ्या घरी राहत असताना रात्री मुलांसोबत फिरायला जाणे, घरी उशिरा येत असल्याने माझ्या आईने तिला घर सोडायला सांगितले. १० दिवसांपूर्वी तिला घरातून काढून टाकले होते. याच गोष्टीचा राग धरून स्वरा मला धमकावत होती. मंगळवारी रात्री वर्षा, रोहिणी, स्वरा यांनी माझ्या घरी येऊन कटरने माझ्यावर वार केले.