अल्लड प्रेमातून पलायन, तिची एक चूक अन्‌ गॅस एजन्सीचे कर्मचारी बनून पोलीस धडकले घरी!, बुलडाणा, सिडको बसस्थानक ते रांजणगाव शेणपुंजी... LOVE STORY चा प्रवास...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १६ वर्षीय मुलीचे प्रेमप्रकरण वडिलांना कळल्यानंतर त्‍यांनी तिला बुलडाण्याहून बहिणीकडे छत्रपती संभाजीनगरला पाठविण्याचा निर्णय घेतला. ती बहीण, भावजीसोबत सिडको बसस्थानकावर उतरताच २० वर्षीय प्रियकराने मित्रांच्या मदतीने तिला पळवले. रांजणगाव शेणपुंजीत त्‍यांनी संसार थाटला. गेले ३ महिने पोलीस त्‍यांना शोधत होते. अखेर मुलीने नकळत पोलिसांना त्‍यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग दाखवला. तिने फेसबुकवर मैत्रिणीची पोस्ट लाइक केली... अन्‌ पुढे तांत्रिक तपासातून पोलिसांनी त्‍यांचे घर गाठले... रविवारी (२४ ऑगस्ट) दोघांना ताब्‍यात घेण्यात आले.


मुलगा आणि मुलगी दोघेही बुलडाण्याचे असून, प्रियकर पृथ्वीराज अवसरमोल (वय २०) हा शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत होता.  मुलीचे प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर वडिलांनी तिला बहीण व भावजीसोबत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना हे माहीतच नव्हते, की तिचा प्रियकर आधीपासूनच छत्रपती संभाजीनगरला शिक्षणासाठी आहे. १५ मे रोजी मुलगी बहीण, भावजीसोबत सिडको बसस्थानकावर उतरताच पृथ्वीराजसोबत तिने पलायन केले. त्‍याच दिवशी त्‍यांनी मोबाइल क्रमांक बंद केले. एटीएमही वापरले नाही. घरी चौकशी करतील म्हणून पृथ्वीराजने स्वतःच्याही घरच्यांशी संपर्क तोडला. त्यामुळे दोघांचेही कुटुंब घाबरून गेले. दोघांसोबत काही अनुचित प्रकार तर घडला नाही, अशी चिंता पोलिसांनाही वाटली. पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक सतीश जोगस यांनी तीन महिने या युगुलाचा कसोशीने शोध सुरू ठेवला. यासाठी तांत्रिक तपासाची मदत घेतली. 

फेसबुक पोस्ट लाइक केली अन्‌ पोलिसांचा मार्ग केला सोप...
दोन आठवड्यांपूर्वी मुलीने तिच्या मैत्रिणीची फेसबुक पोस्ट लाईक केली. ही बाब मैत्रिणीने तिच्या घरच्यांना सांगताच त्‍यांनी पोलिसांना कळवले. लगेचच सायबर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार संजय साबळे, अंमलदार नितीन देशमुख, धनंजय सानप, सीमा चव्हाण, संगीता दुबे यांनी लाईक केलेल्या प्रोफाईलला ज्‍या मोबाइलने लॉगीन केले, तो मोबाइल क्रमांक मिळवला. त्‍याचे लोकेशन रांजणगाव शेणपुंजी दाखवत होते. नेमके रांजणगाव शेणपुंजीत कुठे राहतात, हे समोर येत नव्हते. त्याच क्रमांकावरून त्यांनी नव्या गॅस कनेक्शनसाठी अर्ज केल्याची पोलिसांना कळले. त्यांनी गॅस एजन्सीला संपर्क केला. मात्र तोपर्यंत पृथ्वीराजने दिलेला पत्ता सोडून १६ ऑगस्टला खोली बदलली होती.

गॅस कर्मचाऱ्यांच्या वेशात पोलीस आले घरी...
केवायसीचे करण्याचे निमित्त करून पोलिसांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुलीने कॉल उचलून घराचा पत्ता सांगताच पोलीस उपनिरीक्षक सतीश जोगस, पोलीस अंमलदार हैदर शेख, संतोष मोळके, वर्षा पवार यांनी गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वेशभूषा धारण केली अन्‌ युगुलाच्या घरी पोहोचले. तिथे दोघेही मिळून आले. पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले. पृथ्वीराजला अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पृथ्वीराज आणि मुलीने लग्नासाठी अनेक संस्थांशी संपर्क केला. मात्र तिचे वय कमी असल्याने संस्थांनी नकार दिला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी

Latest News

वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी वाळूज एमआयडीसीतील खासगी कंपनीत दुर्घटना, २० वर्षीय तरुणीचे दोन्ही हात निकामी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एच सेक्टरमधील मौर्या ऑटो या कंपनीतील दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. २० वर्षीय...
खुलताबादमध्ये जरजरी बक्ष उर्स २९ ऑगस्टपासून; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
संघ लोकसेवा आयोगामार्फत १४ सप्टेंबरला राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा–II,  छ. संभाजीनगरात १६ परीक्षा केंद्र, ४७०२ उमेदवार
गारखेड्याच्या नवनाथनगरात मध्यरात्री राडा; गोंधळ घालू नका म्हणताच चौघांनी लोखंडी रॉडने दोन भावांना केले रक्‍तबंबाळ!!
हरवलेली चिमुकली पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरुप आईच्या कुशीत!, बजाजनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software