छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन १२ येथील चाटबाट रेस्टॉरंटच्या ५ ते ६ वेटर्सनी कुटुंबासह जेवायला आलेल्या डॉक्टरांना बेदम मारहाण केली. लोखंडी रॉडने पायावर मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या पत्नीलाही त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात बुधवारी (२३ जुलै) सिटी चौक पोलिसांनी गुड्डू नावाच्या वेटरसह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. गाझी मुहीब अब्दुल हमीद (वय ३५, रा. लेबर कॉलनी हनुमान मंदिरामागे विद्यालंकार क्लासेसजवळ) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते घाटी रुग्णालयात हृदयरोग तज्ञ आहेत. १७ जुलै रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ते कुटुंबासह चाटबाट रेस्टॉरंट एन-१२ येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर त्यांनी पिझ्झा पार्सलची ऑर्डर वेटरला दिली. ऑर्डर देऊन काही वेळ थांबले. नंतर लहान मुले रडत असल्यामुळे ते कुटुंबासह चाटबाट हॉटेलसमोर पार्क केलेल्या त्यांच्या कारमध्ये बसले. पिझ्झा ऑर्डर देऊन बराच वेळ झाल्याने त्यांनी कारचा हॉर्न वाजवला व वेटरला बोलावले. त्यावेळी एक वेटर बाहेर आला असता, डॉ. काझी यांनी त्याला विचारले की, अजून किती वेळ लागणार आहे. त्यावर वेटरने सांगितले की, पिझ्झा बनवायला वेळ लागेल.
त्यानंतर निळा टी शर्ट घातलेला दुसरा व्यक्ती कारजवळ आला. त्याने विचारले की, हॉर्न का वाजवत आहे, त्यावर डॉक्टरांनी सांगितले की, माझी ऑर्डर कॅन्सल करून मला माझे पैसे परत करा. त्यावर तो व्यक्ती शिवीगाळ करू लागला. त्याचवेळी इतर पाच ते सहा जण तेथे जमा झाले. डॉ. गाझी हे कारमधून बाहेर आले असता त्यांनी हाताचापटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पांढरा टी शर्ट घातलेल्याने त्याच्या हातात असलेल्या रॉडने डॉ. गाझी यांच्या डाव्या गुडघ्यावर मारून गंभीर जखमी केले. त्यांची पत्नी राबिया जावेद यांनाही शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यापैकी निळा टी शर्ट घातलेल्या व्यक्तीस इतर पाच ते सहा जण त्याला गुड्डू या नावाने आवाज देत होते. डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवारी (२३ जुलै) सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डॉक्टरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.