- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरात रोडरोमिओंची खैर नाही... शाळा, कॉलेजसमोर मुलींची छेड काढणाऱ्यांच्या पाठीवर पोलिसा...
छत्रपती संभाजीनगरात रोडरोमिओंची खैर नाही... शाळा, कॉलेजसमोर मुलींची छेड काढणाऱ्यांच्या पाठीवर पोलिसांच्या लाठीचे वळ उमटणार! पालकांकडून स्वागत

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या एका मोठ्या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत होत आहे. रोडरोमिओंविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. शाळा, कॉलेजसमोर पोलीस साध्या वेशात थांबणार आहेत, एका मुलीची छेड काढताना, धिंगाणा घालताना, टवाळखोरी करताना कुणी दिसला की त्याला पकडून बेदम चोपणार आहेत. यासाठी शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ५ अधिकारी व ३० अंमलदारांचे विशेष पथक नेमले आहे. सोमवारपासून (२८ जुलै) त्यांनी कामगिरीला सुरुवातही केली असून, पहिल्याच दिवशी रोडरोमिओंच्या पाठीवर लाठीचे वळही उमटवले आहेत. त्यामुळे स. भु. परिसरात धावपळ सुरू झाली होती.
स. भु महाविद्यालयाबाहेर काही दिवसांपासून रोडरोमिओ आणि टवाळखोरांच्या उचापती वाढल्या आहेत. प्राचार्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचे साकडे घातले. याशिवाय रामनगर, संजयनगर, विठ्ठलनगरमधील नागरिकांनीही तक्रार केली होती. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या गंभीर विषयात लक्ष घालत पोलिसांना कारवाईचा फ्री हँड दिला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील प्रत्येक शाळा, कॉलेजसमोर रोडरोमिओ, टवाळखोर दिसला की पोलीस त्यांना चोपणार आहेत.
मोकळी मैदानेही टार्गेटवर...
बीड बायपास, शहानूरमियाँ दर्गा चौक, टीव्ही सेंटर परिसरातील मोकळी मैदानेही पोलिसांकडून रात्री तपासली जात आहेत. दारू व अन्य नशा करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून, शहानूरमियाँ दर्गा परिसरात सिग्मा रुग्णालयामागील मैदानावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नशेखोरांची चांगलीच धुलाई केली.
मुलींनो पोलीस काकांकडे तक्रार करा..
कुणी छेड काढत असेल, त्रास देत असेल तर मुलींनी बिनधास्त पोलीस काकांकडे तक्रार करण्याची गरज आहे. तसे आवाहनच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले असून, ९२२६५१४००१ या क्रमांकावर व्हॉटस् ॲप मेसेज करावा. त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. कोणीही टवाळखोरांचा त्रास सहन करू नये. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी म्हटले आहे.