- Marathi News
- सिटी क्राईम
- पुन्हा संताप : क्लासेसमधून १३ वर्षीय विद्यार्थिनीला घरी आणताना रिक्षात मागे तिच्या बाजूला बसून चालक...
पुन्हा संताप : क्लासेसमधून १३ वर्षीय विद्यार्थिनीला घरी आणताना रिक्षात मागे तिच्या बाजूला बसून चालकाने केले अश्लील कृत्य, टीव्ही सेंटर भागातील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गणेश संपत म्हस्के (वय ३०, रा. आंबेडकरनगर, छत्रपती संभाजीनगर) या चालकाने स्कूलबसमध्ये ९ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली असतानाच, तशाच स्वरुपाची आणखी एक घटना सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना टीव्ही सेंटर भागात ३० जुलैला दुपारी ३ च्या सुमारास घडली असून, आता उजेडात आली आहे.
...तर शाळांविरुद्ध पोलीस कारवाई होणार
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडलेल्या घटनेची पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी यापुढे अशा घटनांत शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आढळला तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मुकुंदवाडीतील गुन्ह्यासोबत शाळेचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांना केली. गेल्या वर्षभरापासून आम्ही सातत्याने शाळांना सूचना करत आहेत. तरीही शाळा इतक्या बेजबाबदार कशा वागू शकतात, असा संताप पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. शाळेचा कुठलाही कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य झाले आणि त्यात संबंधित व्यवस्थापनाने बेजबाबदारपणा केल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.
विद्यार्थिनींची सुरक्षा : शिक्षण विभागाला आली जाग, बोलावली बैठक
दोन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्याच्या घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्व प्रकारच्या शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापकांची स्वतंत्र बैठक ११ ऑगस्टला संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित केली आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व जयश्री चव्हाण यांनी दिली. शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. अनेक शाळांमध्ये या नियमांचे पालन केले जात नाही. पालन होते की नाही हे पाहण्याची तसदी शालेय शिक्षण विभाग घेत नाही. त्यामुळे शाळांचे फावते. मात्र दोन घटनांमुळे आता शालेय शिक्षण विभागात नियमांचे पालन करून घेण्यासाठी सरसावला आहे. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर व प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली नाही तर मान्यता रद्द करण्यात येऊ शकते, असा इशारा आता शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.