आदर्श पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांचा छत्रपती संभाजीनगरात टाहो; ३४७ कोटींचा घोटाळा, ४८ मृत्‍यू, प्रशासनाने मागितला आणखी १ महिना!!

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३४७ कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याला दोन वर्षे उलटून गेली, तरी आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळालेल्या नाहीत. शुक्रवारी (१८ जानेवारी) ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची सायंकाळी भेट घेतली. एका महिन्यात आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लागेल, असे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३४७ कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याला दोन वर्षे उलटून गेली, तरी आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळालेल्या नाहीत. शुक्रवारी (१८ जानेवारी) ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची सायंकाळी भेट घेतली. एका महिन्यात आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना सांगितले. लेखी आश्वासनामुळे महिनाभरासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.

ठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ११ ठेवीदारांनी उपोषण सुरू केले. त्‍यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो ठेवीदार एकवटले होते. प्रशासनाने संयमाची परीक्षा पाहू नये अन्यथा परिणाम गंभीर होतील, असा इशारा ठेवीदारांनी दिला. पतसंस्था बुडीत निघाल्यानंतर आजपर्यंत ४८ ठेवीदारांचा जीव गेला असून, यात सहा वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. आंदोलनस्थळी त्या ४८ जणांचे होर्डिंग्ज लावले होते. या ४८ ठेवीदारांचा मृत्‍यू हा हत्‍या असल्याचे जलील यावेळी म्‍हणाले. ठेवीदार मुक्‍कामी राहण्याचे कपडे घेऊनच आंदोलनात आले होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जलील यांच्यासह शिष्टमंडळाला आश्वासन दिले, की नवीन प्रस्ताव तयार करून सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता विक्रीचे अधिकार देण्याच प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असून, कालबद्ध कार्यक्रम तयार करून मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत देण्यात येतील. या आश्वासनावर इम्‍तियाज जलील पत्रकारांशी बोलताना म्‍हणाले, की ऑगस्ट २०२४ मध्ये अधिसूचना काढूनही मालमत्ता विक्रीसाठी प्रशासनाने पाऊल उचलले नाही. मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने आदर्श पतसंस्थेची प्रतिबंधित मालमत्ता विकत घेतली. फेरफार होणार नाही, असे प्रतिबंधित असतानाही नेत्याच्या जवळचा व्यक्ती म्हणून त्या मालमत्तेचा फेर झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली आहेत. एक महिन्याचा वेळ देतो आहोत, असे जलील म्‍हणाले.

महिलेला भोवळ
पाच महिला ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी सहाला अचानक प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घोषणाबाजी सुरू केली. रक्कम महिनाभरात मिळणार हे लेखी द्या अशी मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. यात एका महिलेला भोवळ आली. त्‍यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने पोलिसांनी जमाव पांगवला.

प्रक्रिया संथगतीने…
गेल्या दोन वर्षांत पदरात काहीही न पडल्याने ठेवीदार संतप्त झालेले आहेत. मालमत्तांचा लिलाव, कर्जवसुली, कर्जदारांची मालमत्ता जप्ती ही सगळी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. सध्या ३३ हजार ६५ ठेवीदारांचे ३४७ कोटी ७२ लाख रुपये पतसंस्थेत अडकले आहेत. २८८१ ठेवीदारांना आतापर्यंत केवळ २ कोटी ८७ लाख देण्यात आले आहेत. १८ कोटी ५० लाखांच्या १५ मालमत्तांचा लिलाव सुरू आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. १५४१ जणांकडे पतसंस्थेचे ३२० कोटींचे कर्ज थकीत असल्याचेही आजवरच्या चौकशीत समोर आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या

Latest News

ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या ऑगस्टमधील पहिला प्रदोष व्रत ६ की ७ ऑगस्टला? पूजा करण्याची तारीख, मंत्र आणि पद्धत जाणून घ्या
प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, प्रदोष व्रत...
नागपंचमीला झोका खेळताना पडून शेतकऱ्याचा मृत्‍यू, पैठणची घटना
अनोळखी पुरुषाकडून लिफ्ट घेणे महिलेला पडले महागात, वाळूजजवळ काय घडलं...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software