- Marathi News
- उद्योग-व्यवसाय
- GOOD NEWS : एलएनके ग्रीन एनर्जी कंपनी छ. संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत उभारणार प्रकल्प, ४७०० कोटींची गुं...
GOOD NEWS : एलएनके ग्रीन एनर्जी कंपनी छ. संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत उभारणार प्रकल्प, ४७०० कोटींची गुंतवणूक, अडीच हजार रोजगार

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीत एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि. कंपनी ६ गिगावॅट क्षमतेचा सोलार सेल व निर्मिती प्रकल्प उभारणार असून, यासाठी कंपनी ४,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून २ हजार ५०० युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्य शासनाच्या महाराष्ट्र इंडस्ट्रिअल टाउनशिप लि. (एमआयटीएल) शी एलएनके ग्रीन एनर्जीने मुंबईत मंगळवारी (१९ ऑगस्ट) सामंजस्य करार केला.
एलएनके ग्रीन एनर्जी ही कंपनी उत्तर प्रदेशातील आहे. प्रकल्पातून २,५०० लोकांना थेट व २,००० लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असून, यासंदर्भातील करारावर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या झाल्या. कंपनीचे संचालक वरुण कराड आणि राज्याचे उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगण उपस्थित होते. एलएनके ग्रीन एनर्जीचा प्रकल्प ऑरिकमधील औद्योगिक आणि निवासी ग्राहकांसाठी स्वच्छ व शाश्वत ऊर्जा पुरविण्यात महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.