- News
- जिल्हा न्यूज
- जनतेचा नोकर झाला मालक!; म्हणाला, नगरपालिकेत यायचं नाही, आम्हाला काम शिकवायचं नाही!!, गंगापूरचे मुख्य...
जनतेचा नोकर झाला मालक!; म्हणाला, नगरपालिकेत यायचं नाही, आम्हाला काम शिकवायचं नाही!!, गंगापूरचे मुख्याधिकारी संतोष आगळेंची आगळीक
गंगापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गंगापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात ते ज्या पद्धतीने नागरिकांशी बोलत आहेत, ते ऐकून सर्वांचाच संताप होत आहे. जनतेचा हा नोकर ज्या पद्धतीने मस्तवालपणे बोलतो ते पाहून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाने आगळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
एका प्रभागात राहणाऱ्या नागरिकांची नावे दुसऱ्या प्रभागातही समाविष्ट असल्याचे समोर आले. त्यामुळे नागरिकांनी मुख्याधिकारी आगळे यांना कॉल केले. त्यावर आगळे हे इतके संतप्त झाले, की नगरपालिकेत तुम्ही यायचा काय संबंध, तुम्हाला कोणी सांगितलं आमचे काय सुरू आहे, आम्हाला शिकवू नका, तुम्ही कोण मला विचारणारे, असे त्यांनी नागरिकांना सुनावले. एकीकडून नागरिक सर, सर म्हणून कॉल केल्याबद्दल सॉरी सॉरी म्हणत होते आणि आगळेंची मात्र आगळीक वाढतच जात असल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये दिसून येते.
जनतेचा सेवक पालिकेचा मालक झाला...
कोणताही मोठा नोकरशहा हा शेवटी जनतेचाच सेवक असतो. जनतेच्याच पैशाने त्याचा पगार होत असतो. मात्र आगळे ही बाब बहुधा विसरले आणि पालिकेचे मालक होऊन त्यांनी नागरिकांशी ज्या पद्धतीने संवाद साधला ते धक्कादायक आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणींवर ते मुख्याधिकाऱ्यांकडेच दाद मागू शकतात. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचे योग्य शब्दांत समाधान करणे गरजेचे असते. मात्र मुख्याधिकारी आगळे यांचे वर्तन पाहता त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त असल्याचा संशयही व्यक्त होत आहे. ज्यामुळे ते इतक्या मस्तवालपणे नागरिकांशी बोलत आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

